दुरुस्तीनंतर चेंबर बनले धोकादायक; मार्केट यार्ड परिसरात अपघाताचा धोका
अनिल दाहोत्रे
महर्षीनगर : महापालिकेचा रस्ते दुरुस्ती विभागच सांडपाणी वाहिनीचे चेंबर धोकादायक करीत असल्याचे चित्र मार्केट यार्ड परिसरातील सॅलिसबरी पार्क परिसरात दिसून येत आहे. दुरुस्तीच्या नावाखाली सुरू असलेल्या या कामाबद्दल मात्र क्षेत्रीय कार्यालयाचे अधिकारी अनभिज्ञ आहेत. सॅलिसबरी पार्कमधील चंद्रकांत गॅरेज चौकात गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे सांडपाणी वाहिनीची दुरवस्था झाली होती. त्यानंतर नादुरुस्त झालेल्या चेंबरची झाकणे बदलण्याचे काम महापालिका प्रशासनाने केले आहे. मात्र, हे काम करताना चेंबरची झाकणे रस्त्याला समांतर नसल्याने त्या ठिकाणी खड्डे तयार झाले आहेत.
ठेकेदारांनी हे काम करताना रस्ता समपातळी करणे अपेक्षित होते. मात्र, तसे न झाल्याने ठिकठिकाणी रस्त्यांवर चेंबरच्या झाकणांमुळे खड्डे तयार झाले आहेत. महापालिका अधिकार्यांचे या कामाकडे दुर्लक्ष झाल्याने हा चौक वाहतुकीस धोकादायक झाला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी छोटे, मोठे अपघात होत आहेत.
या कामाविषयी सहायक आयुक्त अनिल सोनवणे यांना विचारणा केली असता त्यांनी बोलणे टाळून वरिष्ठ अभियंता प्रकाश पवार यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले. पवार यांनी, 'मी नुकताच या कार्यालयात रुजू झालो आहे. कनिष्ठ अभियंता अजय खामकर यांना याबाबत विचारा,' असे सांगितले. खामकर यांनी हे काम झाले असल्याची माहिती नाही. कदाचित पथ विभागाने ते केले असेल, असे सांगून चेंबरची झाकणे धोकादायक झाली असल्यास दुरुस्त करून घेऊ, असे सांगितले.
लाखो रुपये खर्च करून रस्तादुरुस्तीची कामे महापालिकेकडून होतात. मात्र, याबाबत अधिकार्यांना माहिती नसणे हे गलथान कारभाराचे लक्षण असल्याचे नागरिकांनी सांगितले. बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयाच्या या अजब काराभाराबाबत नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे.
महापालिकेचे प्रशासक नागरी सुविधा देण्यात असमर्थ ठरत आहेत. तसेच त्यांच्या हाताखाली काम करणारे अधिकारी देखील बेजबाबदारपणे कामकाज करीत आहेत. या सर्व अधिकार्यांवर गुन्हे दाखल करण्याची आवश्यकता आहे.
– एकनाथ ढोल,
संघटक, आम आदमी पार्टीक्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकार्यांनी जबाबदारीने एक लोकसेवक म्हणून काम केले पाहिजे. त्यांना कामाची माहिती असणे व नागरी सुविधा देणे त्यांचे कर्तव्य आहे. जो अधिकारी कर्तव्यात कसूर करीत असेल, त्यावर कारवाई करण्यात येईल.
– अविनाश सपकाळ,
उपायुक्त, महापालिका