मद्य विक्रीचे दुकान पुन्हा नगर रस्त्यावर! स्थलांतरामुळे वाघोली परिसरातील नागरिकांत रोष | पुढारी

मद्य विक्रीचे दुकान पुन्हा नगर रस्त्यावर! स्थलांतरामुळे वाघोली परिसरातील नागरिकांत रोष

वाघोली; पुढारी वृत्तसेवा: आव्हाळवाडी (ता. हवेली) रस्त्यावरील एका मद्यविक्रीच्या दुकानाचे पुन्हा नगर महामार्गावर स्थलांतर करण्यात आले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असून, नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. या दुकानाचे अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. वाघोली येथे नगर मार्गावर काही वर्षांपूर्वी दोन मद्यविक्रीची दुकाने होती. ग्राहक दुकानासमोर अस्ताव्यस्त वाहने लावून रहदारीस अडथळा निर्माण करत असल्यामुळे या भागात नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. तसेच तळीरामांचा त्रासही नागरिकांना सहन करावा लागत होता.

या सर्व प्रकारामुळे नागरिक, महिला त्रस्त झाल्या होत्या. त्यामुळे स्थानिकांनी या दुकानांविरोधात तक्रारीदेखील केल्या होत्या. मात्र, तक्रारींचा फारसा काही फरक पडला नव्हता. त्या दरम्यान महामार्गावरील दुकाने हटवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. यामुळे ही दोन दुकाने आव्हाळवाडी या रस्त्यावर स्थलांतरित केाली होती, परंतु आता यातील एक दुकान पुन्हा नगर महामार्गावर स्थलांतरित करण्यात आले आहे.

तसेच दुसरेही दारूचे दुकान स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महामार्गावर स्थलांतरित करण्यात आलेल्या दुकानावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क केला असता, मुंबईवरूनच तसे आदेश असल्याचे त्यांनी सांगितले. नेमके कोणी आदेश दिले अशी विचारणा केली असता सध्या मीटिंगमध्ये असून नंतर माहिती देतो, असेही या अधिकार्‍याने सांगितले.

उत्पादन शुल्क अधीक्षकांनी प्रत्यक्ष भेट घेऊन परवानगी नाकारली असताना मद्यविक्रीचे दुकान पुन्हा स्थलांतरित झाले कसे, याबाबत प्रशासनाला विचारणा केली, परंतु त्यांच्याकडून योग्य उत्तर मिळाले नाही. संबंधित विभागाकडून या दुकानाला अभय मिळत असून, या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहे.

                                                   – चंद्रकांत वारघडे, सामाजिक कार्यकर्ते

Back to top button