पुणे : भट्टीवर दुधाला तेजीची उकळी; कोजागरीनिमित्त ग्राहकांकडून रांगा लावून दूध खरेदी | पुढारी

पुणे : भट्टीवर दुधाला तेजीची उकळी; कोजागरीनिमित्त ग्राहकांकडून रांगा लावून दूध खरेदी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोजागरी पौर्णिमेमुळे पार्लरवर दूध खरेदीसाठी रांगा लागल्याचे चित्र कात्रज दूध संघामध्ये रविवारी (दि. 9) रात्री दिसून आले. तर, दुधाच्या मागणीत वाढ झाल्याने रविवारी दिवसभरात नेहमीपेक्षा 60 हजार लिटरने विक्रीत वाढ झाली. दरम्यान, आवक मंदावल्याने गणेश पेठेतील दूधभट्टी बाजारात दुधाला तेजीची उकळी फुटली. म्हशीच्या दुधाचे दर दहा रुपयांनी वाढून 83 रुपये लिटरने विक्री झाल्याचे सांगण्यात आले.

गतवर्षी कोरोना स्थितीच्या सावटामध्ये कोजागरी पौर्णिमा साजरी करताना ग्राहकांमध्ये तेवढा उत्साह नव्हता. मात्र, कोरोना स्थिती निवळल्याने चालू वर्षी गणेशोत्सव, नवरात्र, दसर्‍याचा सण उत्साहात साजरे झाले आहेत. त्यामुळे कोजागरीमुळे दुधाला मागणी वाढण्याची अपेक्षा असल्याने त्यानुसार कात्रज दूध संघाने जादा दूधपुरवठ्याचे नियोजन केल्याचे सांगून संघाचे प्रभारी व्यवस्थापकीय संचालक संजय कालेकर म्हणाले, ‘संघाची दैनंदिन दूध विक्री 1 लाख 20 हजार लिटरच्या आसपास आहे. रविवारी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत त्यापेक्षा 60 हजार लिटर दुधाची जादा विक्री झाली.’ कात्रज दूध संघाच्या मुख्यालय पार्लरवर दुधाच्या खरेदीसाठी नागरिकांनी रात्री उशिरापर्यंत रांगा लागल्याचे चित्र दिसून आले.

गणेश पेठेतील दुधाचे ज्येष्ठ व्यापारी दामोदर हिंगमिरे म्हणाले, ‘कोजागरीमुळे म्हशीच्या दुधाला नेहमीच्या तुलनेत अधिक मागणी राहिली. दरवर्षी वाढीव मागणी लक्षात घेऊन कोजागरीसाठी 4 ते 5 हजार लिटर इतकी म्हशीच्या दुधाची आवक बाजारात होत असते. मात्र, रविवारी दोन हजार लिटर कमी आवक झाली. तुटवड्यामुळे म्हशीच्या दुधाचा 18 लिटर घागरीचा भाव दोनशे रुपयांनी वाढून रविवारी 1500 रुपयांवर पोहचला. म्हणजेच 83 रुपये लिटरने दूध विक्री झाली.’ विशेषतः गणेशोत्सव मंडळे, सोसायट्यांमधील ग्राहकांकडून मागणी चांगली राहिल्याचेही त्यांनी सांगितले.

Back to top button