पुणे : मानसिक ताणामुळे कार्यक्षमतेवर परिणाम | पुढारी

पुणे : मानसिक ताणामुळे कार्यक्षमतेवर परिणाम

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कोरोना काळानंतर मानसिक तणावामध्ये दुपटीने वाढ झाल्याचे निरीक्षण जागतिक आरोग्य संघटनेने नोंदवले आहे. कोरोनामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम झालेच; मात्र सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक स्तरावरही उलथापालथ झाली. सततच्या मानसिक ताणाने कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे ‘बोलते व्हा, संवाद साधा’ असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांनी दिला आहे.

सर्दी, ताप, खोकला झाला की, डॉक्टरकडे पळणारे आपण मानसिक स्वास्थ्याच्या बाबतीत मात्र बेफिकीर असतो. परिस्थिती हाताबाहेर जात नाही तोपर्यंत आपण त्याची दखल घेत नाही. सध्या उदासीनता व चिंतेचे प्रमाण वाढत आहे. काहींना ताण नीट हाताळता येतो. परंतु, काहींना तो कसा हाताळावा हेच समजेनासे होते. त्यामुळे बाह्य जगात वावरताना व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो व मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.

असे आहेत परिणाम
चिडचिड वाढणे
विचारात गोंधळ निर्माण होणे
झोप न येणे किंवा अतिझोप येणे
डोकेदुखी, रक्तदाब, हृदयविकार

उपाय काय करावेत?
समुपदेशकांची मदत घ्यावी.
व्यायाम, योगासने करावीत.
चौरस आहाराला महत्त्व द्यावे.
संगीत व छंद जोपासावेत.
पुरेशी झोप घ्यावी.

परिवर्तन संस्थेमार्फत 30 वर्षांपासून मानसिक आजार असणार्‍या रुग्णांसाठी काम केले जात आहे. ‘परिवर्तन’मार्फत तीव— मानसिक रुग्णांच्या पुनर्वसनासाठी ‘किमया कॅफे’ सुरू करण्यात आला आहे. मानसिक आजाराशी संघर्ष करणारे रुग्णमित्र-मैत्रिणी स्वत: सकाळी 8 ते रात्री 8 कॅफे चालवितात.
                                     – रेश्मा कचरे, प्रकल्प समन्वयक, परिवर्तन संस्था

मनमोकळा संवाद हा मानसिक ताणावरचा एकमेव उपाय आहे. कुटुंबीयांशी, मित्र-मैत्रिणींशी बोला, मनातल्या दु:खाचा निचरा करा, एकमेकांना आधार द्या.
                                                    – जान्हवी कुलकर्णी, समुपदेशक

Back to top button