पुणे : पेट्रोल, डिझेल चोरीतील मोठे रॅकेट उद्ध्वस्त | पुढारी

पुणे : पेट्रोल, डिझेल चोरीतील मोठे रॅकेट उद्ध्वस्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा : लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोल-डिझेल चोरीचे मोठे रॅकेट गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने 3 महिन्यांपूर्वी उद्ध्वस्त केले होते. त्यातच आता लोणी काळभोर पोलिसांनी इंधन चोरीच्या नवीन रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सात जणांना बेड्या ठोकल्या आहेत. या वेळी 79 लाखांचे पेट्रोल आणि डिझेल भरलेले दोन टँकर आणि 7 मोबाईल आणि चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे.

अमीर शेख (32, रा. वस्ती, लोणी काळभोर, मूळ रा. बार्शी, सोलापूर), सचिन सुरवसे (30, रा. सिद्राममळा, लोणी काळभेार, मूळ रा. करमाळा), विजय जगताप (52, रा. अंबरनाथ मंदिराजवळ, लोणी काळभोर,) महेश काळभोर (42, रा. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर), रामचंद्र देवकाते (41, रा. संभाजीनगर, लोणी काळभोर), धीरज काळभोर (36, रा. कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे) आणि इसाक मजकुरी (42, रा. संभाजीनगर, तारा हाईट्स, लोणी काळभोर) अशी बेड्या ठोकलेल्यांची नावे आहेत. पोलिस शिपाई बाजीराव चंदर वीर यांनी फिर्याद दिली आहे.

दि. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती येथील दत्त हॉटेलसमोर महेश काळभोर यांच्या जागेत तसेच भारत टायर्समागे अटक केलेल्या संशयित आरोपींकडून डिझेल-पेट्रोलची चोरी सुरू असल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक दत्ता चव्हाण आणि गुन्हे निरीक्षक सुभाष काळे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन छापा टाकला. या वेळी 79 लाख 51 हजारांचे पेट्रोल-डिझेलचे दोन टँकर जप्त केले. यामध्ये आणखी आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता आहे. या टोळीला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे, अमोल घोडके यांच्या पथकाने केली.

अशी होत होती चोरी
पेट्रोलचे टँकर डेपोतून बाहेर पडल्यानंतर ते डेपोपासून जवळच असलेल्या निर्जनस्थळी नेऊन त्यातील पेट्रोल चोरून घेत होते. यासाठी ते टँकरचे सील तोडून चोरी करत होेते. नंतर ते सील पूर्वस्थितीत करत होते. तीन महिन्यांपूर्वीच पेट्रोल-डिझेलचे रॅकेट गुन्हे शाखेने उघड केले होेते. तरी देखील अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींकडून पेट्रोल-डिझेलची चोरी करण्यात आली होती. हेच रॅकेट आता स्थानिक पोलिसांनी उद्ध्वस्त केले आहे. त्यांचा हा चोरीचा प्रकार केव्हापासून सुरू होता? याबाबतची माहिती सखोल तपासानंतरच समोर येईल, अशी माहिती या वेळी पोलिसांनी दिली.

79 लाख 51 हजारांचे पेट्रोल-डिझेलचे भरलेले दोन टँकर जप्त

संशयित आरोपी आयओसीएल डेपोतील टँकर निर्जनस्थळी नेऊन त्यातील पेट्रोल-डिझेलची चोरी करीत होते. अटक करण्यात आलेल्यांमध्ये चालक, रॅकेटमध्ये सक्रिय असलेल्या आरोपींचा सहभाग आहे. यामध्ये आणखी आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पाहता त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे.

                                – दत्ता चव्हाण, वरिष्ठ निरीक्षक, लोणी काळभोर पोलिस ठाणे

Back to top button