कालवा अस्तरीकरणाच्या मुद्द्यावर नौटंकी नको ! विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा विरोधकांवर हल्ला | पुढारी

कालवा अस्तरीकरणाच्या मुद्द्यावर नौटंकी नको ! विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा विरोधकांवर हल्ला

बारामती : पुढारी वृत्तसेवा : निरा डावा कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रविवारी (दि. ९) सोमेश्वरनगर येथे विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. यापूर्वी कालव्याचे पाणी बंद पाईपलाईनने द्या, अशी मागणी करणारी मंडळी आता विरोध करण्याची नौटंकी करून जनतेची दिशाभूल करत आहेत असा घणाघात पवार यांनी केला. शेतकऱयांचा पाठिंबा असेल तरच अस्तरीकरण करणार असल्याचेही ते म्हणाले.

सोमेश्वरनगर येथे शेतकरी मेळाव्यात पवार यांनी कालवा अस्तरीकरणाच्या मुद्द्यावरून जोरदार घणाघात केला. यंदा वीर धरणातून ४० टीएमसी पाणी वाहून गेले. निरा खोऱयातील चार धरणांची क्षमता ४८ टीएमसीची आहे. त्यातील ४० टीएमसी पाणी वाहून जाते. त्यामुळे शेततळे व इतर पर्यांयाचा विचार व्हावा, असे पवार म्हणाले. निरा डावा कालव्याची वहन क्षमता वाढविणे गरजेचे आहे. सध्या कालवा ६५० क्युसेक वेगाने वाहतो. ही क्षमता ११०० ते १२०० क्युसेकवर जाणे गरजेचे आहे. त्यासाठी कालव्याचा पाझर, गळती कमी करावी लागेल. तालुक्यात अस्तरीकरणाला विरोध आणि पाठींबा असे चित्र आहे. अस्तरीकरणासंबंधी बळजबरी करणार नाही. शेतकरी, मतदारांचे हित साधले जाईल, अशी ग्वाही पवार यांनी दिली.

परंतु यापूर्वी बंद पाईपलाईनमधून कालव्याचे पाणी द्या अशी मागणी करणारेच आता विरोध करत दिशाभूल करत असल्याचा पुनरुच्चार पवार यांनी केला. बोलायला काही नाही त्यामुळे विरोधक हा मुद्दा काढत आहेत.

कालव्याच्या वळणावर मोठी गळती होत आहे. त्यामुळे शेतकऱयांची परवानगी असेल तर कागद न टाकता अस्तरीकरण केले जाईल. यापूर्वीही दगड, फरशांचे अस्तरीकरण होते. आता अस्तरीकरण करायचे झाले तर विहिरी, बोअरवेल यांना त्याचा फटका बसणार नाही, याची दक्षता घेतली जाईल. सध्या कालव्याचे मजबुतीकरण केले जात आहे. बारामतीत तीन हत्ती चौकातील पुलाजवळ कालव्याची वहन क्षमता अवघी ४८० क्युसेकवर होती. आता तेथून ९५० क्युसेकने पाणी जावू शकते. त्यामुळे इंदापूरच्या शेतकऱयांनाही योग्य रितीने पाणी मिळू शकणार आहे. शेटफळ तलाव भरणे शक्य होणार आहे. हेड टू टेल सगळ्यांनाच पाणी मिळावे, अशी आमची भूमिका असल्याचे पवार म्हणाले.

१३५ वर्षांपूर्वीचा हा कालवा मातीच्या भरावाचा आहे. १५२ किमी लांबीचा कालवा पुरंदरमध्ये १७ किमी, बारामतीत ८४ किमी तर इंदापूर तालक्यातून ५१ किमी वाहतो. कालवा दिवसेंदिवस कमकुवत होत आहे. कालवा फुटण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे आत्ता काम करायचे नाही तर मग कधी करणार असा सवाल त्यांनी केला.

…तर धुरळा झाला असता

आम्ही प्रयत्न केले नसते तर निरा डावा कालव्याचे कमी झालेले पाणी पुन्हा मिळाले नसते. उन्हाळ्यात कालव्याला पाणीच आले नसते. महाविकास आघाडी सरकारच्या रुपाने सत्तेत आल्यावर फलटण, खंडाळा, माळशिरस तालुक्याचे नुकसान नको आणि पुरंदर, बारामती, इंदापूरलाही फटका नको अशा पद्धतीने मध्यम मार्ग आम्ही काढला. धरणे पुणे जिल्ह्यात असल्याने आम्हालाही पाणी मिळावे यासाठी कायदा केला. फक्त कायदा करून थांबलो नाही तर प्राधिकरणाची, कॅबिनेटची त्याला मंजूरी घेतली. त्यामुळे भविष्यात आता पाणी वाटपाचा निर्णय कोणीही एकतर्फी घेवू शकणार नाही. कायदा केला नसता तर आज पिकांचा धुरळा झालेला दिसला असता असेही पवार म्हणाले.

Back to top button