‘सल्लू’चा वाढदिवस करून घडवले पशुप्रेमाचे दर्शन | पुढारी

'सल्लू'चा वाढदिवस करून घडवले पशुप्रेमाचे दर्शन

वडगाव मावळ : पुढारी वृत्तसेवा :  एकत्र कुटुंब आणि तीन पिढ्यांचा वारसा जपणार्‍या कान्हे येथील नारायण सातकर यांच्या परिवाराने आपल्या ‘सल्लू’ नावाच्या बैलाचा अभीष्टचिंतन सोहळा मोठ्या आनंदात साजरा करत पशुप्रेमाचा आदर्श समाजापुढे ठेवला आहे.
कान्हे येथील प्रगतिशील शेतकरी नारायण सातकर, त्यांचे भाऊ भरत सातकर, संतोष सातकर, अकुंश सातकर ही तीन मुले, सुना, नातवंडे, पतवंडे असा हा परिवार, या परिवारात मनुष्याप्रमाणे मुक्या जनावरांचाही जीव लावून सांभाळ केला जातो.

एकत्र कुटुंबपद्धती जपणार्‍या या कुटुंबांतील शेतीव्यवसायाला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय आहे. हा व्यवसाय गावरान गाई, संकरित मुर्‍हा, जाफर, दिल्ली म्हैस यापासून होणारं दुधाचे उत्पादन हे या कुटुंबांच वैशिष्ट्य आहे. यामध्ये या कुटुंबाचा एक भाग असलेला सल्लू हा खिलार प्रजातीचा पांढरा शुभ— खोंड या कुटुंबातील जिवाभावाचा घटक आहे. या सल्लूने शेतातील मशागत करण्यापासून बैलगाडा शर्यतींमध्ये सातकर कुटुंबीयाला नावलौकिक मिळवून दिला आहे. कुटुंबातील एक सर्वांचा आवडता घटक असलेल्या सल्लूचा वाढदिवस सातकर परिवाराने मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्ताने सातकर परिवाराने नव्या पिढीपुढे पशुप्रेमाचा आदर्शच ठेवला असल्याचे मत कान्हे सोसायटीचे व्हाईस चेअरमन प्रदीप मोहिते यांनी व्यक्त केले.

Back to top button