गाडीला कट मारण्यावरून तरुणाला काठीने मारहाण; भीमाशंकर येथील घटना | पुढारी

गाडीला कट मारण्यावरून तरुणाला काठीने मारहाण; भीमाशंकर येथील घटना

मंचर; पुढारी वृत्तसेवा: गाडीला कट मारण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून निगडाळे म्हातारबाची वाडी येथील वैभव प्रफुल्ल गवारी (वय 20) या तरुणाला चौघांनी काठीने मारहाण केली. ही घटना भीमाशंकर येथे घडली. घोडेगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव गवारी हा मित्राबरोबर संदल पाहण्यासाठी घोडेगाव येथे गेला होता. रात्री घरी येत असताना पिंपळगाव घोडे येथे संकेत कावळे व त्याच्या मित्रांशी गाडीला कट मारल्यावरून वाद झाला.

त्यानंतर वैभव गवारी हा भीमाशंकर येथे तुषार बोर्‍हाडे यांच्या सलूनमध्ये केस कापण्यासाठी गेला असता संकेत कावळे, साजन लांघी व इतर दोन अनोळखी इसमांनी गवारी याला शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. गणेश लोहकरे, इम्रान तांबोळी, अमीर लोहकरे आदींनी भांडणात मध्यस्थी केली. याबाबत वैभव गवारी याने घोडेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार संकेत कावळे (रा. तळेघर खांडेवाडी, ता. आंबेगाव), साजन लांघी(रा. डेहणे खरोशी, ता. खेड) यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button