भोरला डिझेलअभावी एसटीच्या फेर्‍या बंद | पुढारी

भोरला डिझेलअभावी एसटीच्या फेर्‍या बंद

भोर; पुढारी वृत्तसेवा: भोर तालुक्यातील एसटी बसच्या फेर्‍या दुपारनंतर डिझेलअभावी बंद पडत आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. ग्रामीण भागातून शाळा- महाविद्यालयात विद्यार्थी, बाजार, शासकीय कामासाठी नागरिक भोर शहरात येत असतात. त्यासाठी एसटी बसचा वापर केला जातो. दररोज भोर एसटी आगारातून 360 बस फेर्‍या होतात. यासाठी 3 हजार लिटर डिझेल लागते. परंतु, राज्य परिवहन मंडळाने ज्या पंपाला डिझेल पुरवठा करण्यासाठीचा ठेका दिला आहे.

त्या पंपाकडून कमी प्रमाणात डिझेलचा पुरवठा होत असल्याने दुपारनंतर 100 बस फेर्‍या बंद कराव्या लागत असल्याचे भोर आगार वाहतूक निरीक्षक रायबा कुलकर्णी यांनी सांगितले. याचा त्रास विद्यार्थी, नागरिकांना होत आहे. त्यांना खासगी वाहनातून जादा पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. भोर आगारात एकूण 51 बसेस सुव्यस्थित असून 74 वाहक, 97 चालक कार्यरत आहेत. यातून 10 वाहक, 3 चालकांची पदे रिक्त असूनदेखील सर्व मार्गांवर बस फेर्‍या पूर्ण केल्या जातात. परंतु डिझेलअभावी दुपारनंतरच्या या फेर्‍या कमी होत असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

Back to top button