पिंपरी : कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन करा : आयुक्त सिंह | पुढारी

पिंपरी : कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन करा : आयुक्त सिंह

पिंपरी : शहरातील ज्या गृहनिर्माण, हॉटेल्स, रेस्टॉरंट, कंपन्या किंवा इतर आस्थापनांमध्ये प्रतिदिन 100 किलो आणि त्यापेक्षा अधिक कचरा निर्माण होतो, अशा आस्थापनांनी त्यांच्या स्तरावर कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.

ओल्या कचर्‍यावर प्रकिया करून जिरवणे बंधनकारक
नागरी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी अधिनियम 2016 अन्वये प्रतिदिन 100 किलो कचरा निर्माण करणार्‍या गृहनिर्माण संस्था अथवा इतर आस्थापना यांनी त्यांच्या आस्थापनेत निर्माण होणार्‍या ओल्या कचर्‍यावर प्रकिया करून जिरवणे बंधनकारक आहे. या कचर्‍याचे कम्पोस्टिंग कसे करावे, कचर्‍यावर प्रक्रिया करणार्‍या संस्थाबाबतची माहिती संबंधित आस्थापनांना व्हावी, यासाठी पालिकेच्या वतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी ते बोलत होते.

पिंपळे गुरव येथील नटसम—ाट निळू फुले रंगमंदिर या ठिकाणी आयोजित कार्यशाळेस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, आरोग्य विभागाचे उपायुक्त अजय चारठाणकर, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे, स्वच्छ सर्वेक्षण समन्वयक विनोद जळक, सुचेता पानसरे, सोनम देशमुख यांसह गृहनिर्माण संस्था, हॉटेल्स, रेस्टॉरंट, कंपन्या, आस्थापनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

85 टक्के कचर्‍याचे विलगीकरण
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, की सद्यस्थितीत शहरामध्ये सुमारे 85 टक्क्यांपेक्षा जास्त कचर्‍याचे विलगीकरण होत आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार संबंधित आस्थापनांनी कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन केले पाहिजे. कचरा विलगीकरणासोबत आता प्रतिदिन 100 किलोपेक्षा अधिक प्रमाणात कचरा निर्मिती होत असलेल्या आस्थापनांनी त्या कचर्‍याचे व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे. प्रकल्प उभारणीकरिता आवश्यक माहिती देण्यासाठी महापालिका या आस्थापनांना मदत करेल.

Back to top button