मंचर : बटाटा वाण खरेदीकडे पाठय अतिपावसाचा परिणाम, व्यापारी संकटात | पुढारी

मंचर : बटाटा वाण खरेदीकडे पाठय अतिपावसाचा परिणाम, व्यापारी संकटात

संतोष वळसे पाटील

मंचर : अतिपावसामुळे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बटाटा वाण खरेदीसाठी शेतकरीवर्ग फिरकत नसल्याने महागडा बटाटा वाण खराब होऊ लागला आहे. पाऊस न थांबल्यास बटाटा वाण खराब होण्याचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापारी संकटात सापडला आहे. पावसामुळे बटाटा लागवडीचा आगाद हंगामही धोक्यात आला आहे. त्याचा परिणाम बटाटा उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात बाजारात बटाटा तेजीत राहण्याची चिन्हे आहेत.

सध्या बटाटा वाणाचा आगाद हंगाम सुरू आहे. परंतु, गेले अनेक दिवस सुरू असलेल्या पावसामुळे बटाटा वाण खरेदी करण्यास शेतकरी फिरकत नसल्याने व्यापारी व आडतदार हतबल झाले आहेत. जून व जुलै महिन्यात पावसाळी बटाटा वाणाची खेड, आंबेगाव आणि जुन्नर, पुसेगाव, महाबळेश्व, नगर जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा, पारनेर परिसरामध्ये बटाटा लागवड होत असते. यंदा ती अतिशय कमी प्रमाणात झाली असल्याची माहिती मंचर बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांनी दिली.

जुलैपासून ते आतापर्यंत पडत असलेल्या पावसामुळे पावसाळी लागवड धोक्यात आली आहे. पावसाच्या फटक्यातून वाचलेला बटाटा ऑक्टोबरमध्ये बाजारात येणे अपेक्षित होते. परंतु, पावसामुळे काढणी लांबवणीवर पडली आहे. त्यामुळे हा बटाटाही खराब होण्याची शक्यता आहे.ऑगस्ट- सप्टेंबरपासून बटाटा लागवडीचा दिवाळी हंगाम सुरू होतो. आगाद बटाटा लागवडीवर देखील वरुणराजाने अवकृपा केली आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर या महिन्यात लागवड झालेल्या बटाटाचे पिक 60 टक्के वाया गेले आहे.

त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी वर्गास बटाटा वाण व लागवडीसाठी खर्च करावा लागणार आहे. होणार्‍या नुकसानीमुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे, अशी माहिती मंचर बाजार समितीचे बटाटा वाणाचे व्यापारी संजय मोरे, नितीन थोरात यांनी दिली. बटाटा वाणाचे क्विंटलचा भाव सरासरी पाहता 3200 ते 3800 रुपये इतका आहे. एकरी साधारणत: लागवडीचा खर्च 50 ते 60 हजार रुपये इतका येतो. सद्यस्थितीत हा खर्च शेतकर्‍यांना परवडणारा नाही. त्यातच तरकारीसह सर्तवच शेतमालाचे भाव कोसळल्याने शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे. अशीच परिस्थिती मंचर मार्केट यार्डमधील बटाटा वाणाचे व्यापारी व आडतदार वर्गाची झाली आहे, अशी माहिती बटाटा वाणाचे व्यापारी शिवाजीराव निघोट यांनी दिली.

जून, जुलैमध्ये ज्योती व वेफर्ससाठी चिप्स क्वॉलिटी बटाटा वाणची लागवड होत असते. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजेच दिवाळीच्या हंगामात पुखराज बटाटा वाणाची मागणी असते. मागील वर्षी म्हणजे सन 2021 मध्ये याच बटाटा वाणांचे बाजारभाव 1500 ते 1800 रुपये प्रतिक्विंटल असे होते. यंदा बटाटा वाणाचे बाजारभाव 3200 ते 3800 रुपये प्रतिक्विंटल असे आहेत. पावसाचे प्रमाणदेखील भरपूर असल्याने शेतकरी हतबल झाला आहे, असे देवगावचे प्रगतशील शेतकरी बाबाजी गावडे यांनी सांगितले.

मंचर बाजार समितीमध्ये 500 पोत्याच्या 15 ते 20 गाडीमाल शिल्लक आहे. म्हणजेच जवळपास 8000 ते 10000 हजार बटाटा पोती बाजारामध्ये शिल्लक आहे. आंबेगाव, खेड, जुन्नर तसेच सातारा, लातूर, बीड, उस्मानाबाद, औरंगाबाद, जालना आणि नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी हा बटाटा वाण न नेल्यास तो खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यापार्‍यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत. पावसामुळे बटाट्याचे उत्पादन कमी होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीत बाजारपेठेत कमी प्रमाणात आवक होऊन बटाट्याचे भाव तेजीत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसू शकतो.

Back to top button