पिंपरी : लसीकरणाचे प्रमाण घटले ; कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन लस घेणारे अत्यल्पच | पुढारी

पिंपरी : लसीकरणाचे प्रमाण घटले ; कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन लस घेणारे अत्यल्पच

दीपेश सुराणा : 

पिंपरी : शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घेण्याचे प्रमाण घटले आहे. विशेषत: कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसीचे लसीकरण सध्या खूपच अत्यल्प प्रमाणात होत आहे. महापालिकेकडून ऑगस्टपासून तीन प्रकारच्या लस 8 केंद्रांवर प्रत्येकी 300 लस याप्रमाणे उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली. मात्र, कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड या लस घेण्याचे प्रमाण 8 केंद्रांवर मिळून लसनिहाय प्रत्येकी पन्नासच्या आत आले आहे.

कोर्बेव्हॅक्स लस घेण्याचे प्रमाण सर्वांधिक
महापालिकेच्या वतीने 12 ऑगस्टपासून 8 केंद्रांवर कोर्बेव्हॅक्स, कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिनचे प्रत्येकी 300 डोस देण्यात येत होते. सध्याची वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे. गेल्या आठ दिवसांतील त्याबाबतची माहिती घेतली असता, सध्या कोर्बेव्हॅक्स ही लस घेण्याचे प्रमाण सर्वांधिक आहे. 12 ते 14 वयोगटांतील मुलांना कोर्बेव्हॅक्स लसीचा पहिला, दुसरा डोस दिला जात आहे. त्याशिवाय, 18 वयोगटापुढील नागरिकांना या लसीचा प्रिकॉशन डोसदेखील दिला जात आहे.

दिवसभरात 267 जणांना कोर्बेव्हॅक्स लस
कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लसचा दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांनाही कोर्बेव्हॅक्स लसचा बूस्टर डोस घेण्यास केंद्र सरकारने परवानगी दिलेली आहे. त्यामुळे महापालिका केंद्रांवर कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिनचा पहिला व दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांना बूस्टर डोस म्हणून कोर्बेव्हॅक्स लस दिली जात आहे. महापालिकेच्या 8 केंद्रांवर शनिवारी दिवसभरात कोर्बेव्हॅक्स लसीचे 267 जणांना लसीकरण करण्यात आले आहे.

कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन लसीकरण घटले
कोव्हिशिल्ड लसचे 1 ऑक्टोबर रोजी 8 केंद्रांवर मिळून 115 इतके डोस देण्यात आले होते. तर, शनिवारी (दि. 8) दिवसभरात केवळ 45 लस देण्यात आल्या आहेत. 1 ऑक्टोबर रोजी 8 केंद्रांवर मिळून 71 जणांना कोव्हॅक्सिन लस देण्यात आले होते. तर, शनिवारी दिवसभरात केवळ 33 जणांना ही लस देण्यात आली आहे. कोरोनाविषयी कमी झालेली भीती आणि बूस्टर डोस घेण्याकडेही नागरिकांचा कमी होत चाललेला कल, यामुळे केंद्रांवर आता लस घेण्यासाठी येणार्‍या नागरिकांचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे लसीकरणदेखील कमी होत असल्याची माहिती केंद्रांतून देण्यात आली.

 

महापालिकेच्या 8 लसीकरण केंद्रांवर कोरोनाची लस घेण्यासाठी येणार्‍या नागरिकांचे प्रमाण घटले आहे. सध्या कोणत्याही लसचा तुटवडा नाही. केंद्रांना आवश्यकतेनुसार लस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. ज्या नागरिकांनी पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस घेतलेला नाही, त्यांनी दुसरा डोस घ्यावा. तर, ज्यांनी दुसर्‍या डोसनंतर बूस्टर डोस घेतलेला नाही, त्यांनी तो घ्यायला हवा.
                  – डॉ लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी

नवीन जिजामाता रुग्णालयातील केंद्रावर सध्या दिवसाला 21 ते 50 नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. जर, एखाद्या संस्थेत लसीकरण शिबिर असल्यास तेथे दिवसाला 100 ते 150 जणांचे लसीकरण होते. केंद्राला जेवढ्या लसची गरज आहे. तेवढ्याच लसची मागणी आम्ही महापालिका प्रशासनाकडे करतो. त्यानुसार, लस उपलब्ध करून दिल्या जातात.
                     – डॉ. करुणा साबळे, नवीन जिजामाता रुग्णालय, पिंपरी

 

केंद्रांच्या मागणीनुसार लस
महापालिकेच्या 8 केंद्रांवर करण्यात येणारे लसीकरण घटल्याने केंद्राकडून करण्यात येणार्‍या मागणीनुसार आवश्यक लस पुरवठा महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे, अशी माहिती चिंचवड येथील तालेरा रुग्णालय आणि पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयातून देण्यात आली.

Back to top button