चौफुला-न्हावरा रस्त्याचा सर्व्हे; दिवाळीनंतर रस्त्याच्या कामाला मिळणार मुहूर्त | पुढारी

चौफुला-न्हावरा रस्त्याचा सर्व्हे; दिवाळीनंतर रस्त्याच्या कामाला मिळणार मुहूर्त

राजेंद्र खोमणे

नानगाव : ”चौफुला-न्हावरा रस्ता खातोय खस्ता” या मथळ्याखाली दै. ‘पुढारी’ने नुकतीच या रस्त्याची झालेली दयनीय अवस्था आणि नागरिक, प्रवासी, वाहनचालक यांच्या समस्या मांडल्या होत्या. या वृत्तमालिकेचे सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात आले होते. याच वृत्तमालिकेनंतर संबंधित रस्त्यावर सर्व्हेचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. या मार्गाच्या कामाला दिवाळीनंतर मुहूर्त लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दौंड आणि शिरूर या दोन तालुक्यांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. शिरूर-सातारा या मार्गावरील चौफुला (ता. दौंड) ते न्हावरा (ता. शिरूर) या मार्गाची दयनीय अवस्था झाली होती. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था या रस्त्याची झाली आहे. ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे, साईडपट्ट्यांची झालेली बिकट अवस्था यामुळे दिवसेंदिवस छोटे-मोठे अपघात सुरू होते. त्यामुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला होता.

दरम्यान सध्या या मार्गावर सर्व्हेचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. दिवाळीनंतर न्हावरा ते चौफुला या मार्गाच्या कामाला मुहूर्त मिळणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या सुरू झालेल्या सर्व्हेच्या कामामुळे रस्त्याचे काम आता होणार अशी आशा दिसून येत आहे. तसेच मोठा व चांगला रस्ता झाल्यावर सर्वाचाच प्रवास सुखाचा होण्यास मदत होणार आहे.

Back to top button