खोर : डोंबेवाडीतील तलाव पावसाने ओव्हरफ्लो | पुढारी

खोर : डोंबेवाडीतील तलाव पावसाने ओव्हरफ्लो

खोर; पुढारी वृत्तसेवा: खोर येथील डोंबेवाडी पाझर तलावाची पाणी साठवण क्षमता ही मोठी असून, हा तलाव पूर्ण भरला गेला की खोर गावाबरोबरच देऊळगाव गाडापर्यंतच्या गावाचा पाणीप्रश्न मार्गी लागला जात असतो. या वर्षी पावसाच्या पाण्यानेच हा तलाव ओव्हरफ्लो झाल्याने गावकऱ्यांचा पाणीप्रश्न मिटला आहे. डोंबेवाडी पाझर तलाव हा पुरंदर जलसिंचन योजनेच्या लाभ क्षेत्रात येत नसल्याने या तलावात आवर्तन सोडण्यास दर वर्षी अडचण येत असते. या तलावाच्या उशाशी पुरंदर जलसिंचन उपसा ही मोठी पाणी योजना कार्यरत आहे.

मात्र, दौंड तालुक्यातील असलेला डोंबेवाडी तलाव हा सिंचन योजनेच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याने दुष्काळी काळात हा तलाव कोरडाठाक पडलेला असतो. दौंडचे आमदार राहुल कुल यांनीदेखील सातत्याने या विषयावर आवाज उठविला असून, या तलावाचे फेरसर्वेक्षण करून तलाव लाभक्षेत्र विषय मिटवण्याच्या बाबतीत हालचाली सुरू केल्या आहेत.

दौंड तालुक्याच्या दक्षिण भागातील पाणीसमस्या ही सर्वांत मोठी समस्या असून, या महत्त्वाच्या विषयाला लवकरात लवकर हात घालून जनाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजनेतील समाविष्ट खोर, पडवी, देऊळगाव गाडा, कुसेगाव, वासुंदे, हिंगणीगाडा, रोटी, जिरेगाव व पांढरेवाडी या गावांतील योजनेमध्ये समाविष्ट, परंतु भरता न येणारे तलाव, समाविष्ट व भरता येणारे तलाव व नव्याने समाविष्ट करण्याचे तलावांचे फेर सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मोठी मागणी प्रकल्प अधिकारीवर्गाच्या बैठकीत घेण्यात आली आहे.

Back to top button