सांडपाण्यामुळे रोगराईचा धोका; कोंढवा परिसरातील पालखी मार्गावरील समस्या | पुढारी

सांडपाण्यामुळे रोगराईचा धोका; कोंढवा परिसरातील पालखी मार्गावरील समस्या

कोंढवा; पुढारी वृत्तसेवा: परिरातील हेवन पार्क भागात पालखी मार्गावर काही ठिकाणी सांडपाणी तुंबले जात असून, ते काही ठिकाणी रस्त्यावरून वाहत आहे. यामुळे परिसरात डास, माश्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
महंमदवाडी परिसरातील जुना पालखी मार्गावर सध्या सांडपाणी तुंबणे व रस्त्यावरून वाहत असल्यामुळे, कृष्णानगर, आशीर्वादपार्क, लक्ष्मीनगर, हेवन पार्क, तरवडेवस्ती या परिसरातील नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागत आहे.

सध्या पालखी मार्गाच्या रस्त्याचे काम सुरू असून, काही अडचणींमुळे ते अर्धवट अवस्थेमध्ये राहिले आहे. कृष्णानगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक दुचाकी व चारचाकी वाहनचालक या रस्त्याने जातात. मात्र, त्यांना या रस्त्यावरील पाण्याचा अडथळा दूर करण्यासाठी कसरत करावी लागत आहे. महापालिका प्रशासनाने तुंबलेल्या पाण्याचा बंदोबस्त करावा, अन्यथा. आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते अतुल तरवडे यांनी दिला आहे. याबाबत महापालिका अधिकार्‍यांशी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

Back to top button