ताथवडे : वेलींच्या विळख्यात अडकले रोहित्र | पुढारी

ताथवडे : वेलींच्या विळख्यात अडकले रोहित्र

ताथवडे : पुढारी वृत्तसेवा : येथील पुनावळे गावाकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यालगत असणार्‍या रोहित्रांना झाडांनी आणि वेलींनी विळखा घातल्याचे दिसून येत आहे. पिंपरी चिंचवड शहरात यंदा वरुणराजा चांगलाच बरसला आहे. त्यामुळे झाडांची वाढही मोठ्या झपाट्याने झाली आहे. परंतु, रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे मात्र प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहेत. येथील रस्त्याच्या दुतर्फा विजेचे खांब आणि रोहित्रे आहेत. या रोहित्राभोवती झाडांचा आणि वेलींचा विळखा एवढा घट्ट बसला आहे की, यामध्ये रोहित्रे आणि विजेचे खांब दिसेनासे झालेले आहेत.

पालापाचोळ्यामुळे आग लागण्याची भीती
सध्या दुपारच्या वेळेस उन्हाची तीव—ता जास्त असते. झाडांचे किंवा वेलींच्या पालापाचोळा सुकून आगीची दुर्घटना घडू शकते. तसेच, पुनावळे गावात जाणारा या मुख्य रस्त्यावर वाहनांची प्रचंड वर्दळ असते. भविष्यात आगीची दुर्घटना घडल्यास यास जबाबदार कोण? असा प्रश्न स्थानिक रहिवाशी करीत आहेत, त्यामुळे प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देऊन रोहित्राभोवती आणि विजेच्या खांबाभोवती असलेल्या झाडांचा आणि वेलींचा विळखा काढून त्यांचा श्वास मोकळा करावा, अशी मागणी येथील नागरिक करीत आहेत.
पुनावळे, ताथवडे परिसरातील अनेक रोहित्रांना वेलींनी विळखा घातल्याचे दिसत आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा तक्रार करुनही महावितरणचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्याच्या अगोदर वेलींच्या विळख्यातून रोहित्रांना मुक्त करण्याची मागणी केली जात आहे.

Back to top button