रांजणगाव परिसरात अवैध धंदे जोमात, मुली, महिलांना त्रास; ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी | पुढारी

रांजणगाव परिसरात अवैध धंदे जोमात, मुली, महिलांना त्रास; ग्रामस्थांकडून कारवाईची मागणी

रांजणगाव; पुढारी वृत्तसेवा: रांजणगाव गणपती गावात पोलिस ठाण्याच्या जवळपासून ते हद्दीतील अनेक भागांत अवैध धंदे जोरात सुरू आहेत. पोलिसांच्या डोळ्यावर पट्टी बांधल्याचे चित्र आहे. शाळकरी मुली व महिलांना याचा मोठा त्रास होत असून, पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थ करत आहेत.

पोलिस नियंत्रण कक्षाला अनेकवेळा सजग नागरिकांनी अवैध धंदे सुरू असल्याबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र, पोलिसांना हे अवैध धंदे प्रत्यक्ष ठिकाणी सुरू असल्याचे सापडले नाहीत. अवैध धंद्यांमध्ये मटका, जुगार, गांजा, गुटखा, हातभट्टी व विदेशी दारूविक्रीचे प्रकार सर्वाधिक असल्याचे दिसून येते. पुणे-नगर महामार्गावरील अनेक लॉजवर तर देहविक्रीही सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

काही धंदे अक्षरशः मानवी वस्तीत असून, यामुळे महिलांना मोठा त्रास होत आहे. पुणे-नगर महामार्गावर असलेल्या विनापरवाना हॉटेलमध्ये अवैध दारू विक्री केली जाते. पोलिस ठाण्याच्या मार्गावर तळीराम आपली बैठक मांडतात, परंतु पोलिस यावर कोणतीच कारवाई करत नाहीत. परिणामी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ग्रामीण तरुण व्यसनाधीन बनल्याने काहींचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

दिवसाबरोबरच रात्रीही टोळक्याने बसून गांजा ओढणे, मद्यपान केले जात आहे. यामुळे गुन्हेगारीत अल्पवयीन मुले सामील झाल्याचेही दिसून येत आहे. रांजणगाव येथे श्री महागणपती हे अष्टविनायकपैकी एक देवस्थान आहे. याच परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरू असणे नामुष्कीची बाब आहे. मात्र यावर पोलिस प्रशासन काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अवैध व्यवसायांवर कारवाई करत आहोत. पोलिस ठाण्याच्या मार्गावर असणार्‍या तळीरामांवर तसेच अधिकृत दारू विक्री करणार्‍यांवरही कारवाई केली आहे. यापुढेही अवैध व्यावसायिकांवर कारवाई करू.
                                                          – बलवंत मांडगे, पोलिस निरीक्षक.

Back to top button