पुणे : साडेनऊ कोटींचे बनावट मद्य जप्त; उत्पादन शुल्क विभागाने दाखल केले 1854 गुन्हे | पुढारी

पुणे : साडेनऊ कोटींचे बनावट मद्य जप्त; उत्पादन शुल्क विभागाने दाखल केले 1854 गुन्हे

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्याला सर्वाधिक महसूल देणारा उत्पादन शुल्क विभाग वेगवेगळ्या कारणांतून चर्चेत असतो. यंदा मात्र हा विभाग मद्य तस्करांचा कर्दनकाळ म्हणून चर्चेत आला आहे. तस्करांनी वेगवेगळी शक्क्ल लढवून परराज्यातील बनावट मद्य पुण्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, याला शह दिला तो सहा महिन्यांपूर्वी अधीक्षक म्हणून आलेल्या चरणसिंह राजपूत यांनी. अवघ्या सहा महिन्यांत कारवाया करून 9 कोटी 34 लाखांच्या मुद्देमालासह 1854 गुन्हे दाखल करण्याचा विक्रम त्यांनी नोंदविला आहे.

राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाने एप्रिल ते सप्टेंबर या सहा महिन्यांतच मागील वर्षभर करण्यात आलेली कारवाई पूर्ण केली आहे. या सहा महिन्यांच्या कालावधीत एकूण 1854 विविध प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यामध्ये 1277 वारस गुन्हे निष्पन्न झाले आहेत. त्यामध्ये 1278 आरोपींना अटक करण्यात आली आहे. मागील पूर्ण वर्षभरात (2021) या विभागाने केवळ 1838 विविध प्रकारचे गुन्हे दाखल केले होते. या संपूर्ण वर्षात 5 कोटी 31 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी केवळ सहा महिन्यांतच दुप्पट कामगिरी करून मागील वर्षापेक्षा सुमारे 4 कोटी 3 लाख रुपये अधिक वाढ
केली आहे.

आता तस्कर नव्या जागेच्या शोधात
सर्वाधिक विक्री होऊन तस्करांना पैसे देणारी गोवा बनावटीची व उच्चभ्रूंसाठी लागणारी बनावट स्कॉच ट्रकमधील भुयारी कप्प्यातून आणली जात होती. उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने वाहन अडवून तपासणी केली तरी वाहनात प्लास्टिक पाइप, भुसा, कापसाची पोती आढळून आल्याने अनेकदा बंदोबस्तात वाहने सोडण्यात आली. मात्र, मुंबई गाजविल्यानंतर पुण्यात आलेल्या अधीक्षकांनी खबर्‍यामार्फत पक्की माहिती घेत महामार्गावर ही वाहने अडवून तस्करांची ‘शाळा’ कायमची बंद केली. यामुळे तस्कारांनी देखील आता पुण्याचे ‘मुक्काम पोस्ट’ बदलून नवीन जागा शोधल्याचे दिसते.

अवैध मद्य वाहतुकीसाठी नवनवीन क्लृप्त्या
गोवा राज्यातून अवैधरीतीने मद्याची वाहतूक करण्यासाठी गुन्हेगारांनी विविध क्लृप्त्या वापरल्याचे तपासणीतून दिसून आले. त्यामध्ये बस वाहतुकीची साहित्य ठेवण्याची डिकी, ट्रकमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी केलेले बोगदे, यासह डिझेल टँकचा अर्धा भाग कापून त्यामध्ये देखील मद्याचे बॉक्स लपविण्यात आल्याचे दिसून आले.

या वर्षी 4 कोटींची अधिक वसुली
75 टक्के जप्ती गुन्ह्यांत वाढ
वारस गुन्ह्यात प्रामुख्याने मागील वर्षापेक्षा 25 टक्के वाढ
प्रमुख गुन्ह्यात गोवानिर्मित मद्यामध्ये 500 टक्के वाढ
गोवा बनावटी मद्यार्क, अवैध हातभट्टी, अवैध स्पीरिट वाहतूक हे गुन्हे अधिक
अवैध स्पीरिट वाहतुकीमधून 1 कोटी वसूल
गोवा अवैध मद्यार्क वाहतुकीतून 3 कोटी 75 लाख वसूल

अशी आहे कामगिरी
सहा महिन्यांत 1854 गुन्हे
वारस गुन्हे – 1277
अटक आरोपी – 1278

2021 मध्ये केवळ 1838 गुन्हे
वारस गुन्हे – 1018
अटक आरोपी – 1037
5 कोटी 31 लाख
रुपयांचा मुद्देमाल जप्त

गुन्ह्याची एकूण वर्गवारी
एकूण गुन्ह्यांमध्ये अवैध हातभट्टीनिर्मिती, विक्री व वाहतूक हे प्रमाण 60 ते 65 टक्के
अवैध ढाब्यांवर मद्यविक्रीबाबत छापे – 20 टक्के
अवैध ताडी उत्पादन, विक्री व वाहतूक – 8 ते 10 टक्के
उर्वरित विविध प्रकारचे गुन्हे – 5 टक्के

Back to top button