

पुणे; पुढारी वृत्तसेवा: महापालिकेच्या कामाचा दर्जा सुधारण्यासाठी अभियंत्यांना पदोन्नती देण्यापूर्वी त्यांची त्रयस्थ संस्थेमार्फत परीक्षा घेण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिकार्यांच्या बैठकीत चर्चा झाली असून लवकरच त्याची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती महापालिकेतील एका वरीष्ठ अधिकार्याने दिली. महापालिकेमध्ये सध्या अभियंता वर्गाच्या पदांची सरळसेवा भरती प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया आयटीबीपी या देशपातळीवर स्पर्धा परिक्षा घेणार्या संस्थेतर्फे राबविली जात आहे. महापालिकेमध्ये अभियंता वर्गाची 1 हजार 75 पदे आहेत. त्यापैकी 575 पदे कार्यरत असून सुरू असलेल्या भरती प्रक्रियेमध्ये 200 पदे भरण्यात येणार आहेत.
या प्रक्रियेमध्ये अभियंता वर्गाची 25 टक्के पदे पदोन्नतीतून भरण्यात येतात. प्रामुख्याने बिगारी, शिपाई, क्लार्क यासारख्या पदांवर काम करणार्यांना कनिष्ठ अभियंता या पदावर संधी दिली जाते. या कर्मचार्यांना अभियांत्रिकीची पदविका परीक्षा उत्तीर्ण असल्याची अटही आहे. मात्र, पदोन्नती देताना अनेकदा त्यांना अभियांत्रिकी कामाचा अनुभव अल्प असतो. अभियांत्रिकी कामाच्या अल्पअनुभवाचा थेट परिणाम विकासकामांवरही दिसून येतो. अभियंत्यांच्या कामात, निर्णय क्षमतेमध्ये तसेच कामाच्या दर्जात वाढ करण्यासाठी पदोन्नतीसाठी काय निकष असावेत यादृष्टीने अधिकार्यांची चर्चा झाली. यामध्ये पदोन्नती देताना त्रयस्थ संस्थेच्या मार्फत लेखी परिक्षा घेउनच पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला.
निकाल ऑनलाईन जाहीर
महापालिकेने नुकतीच यांत्रिकी आणि वाहतूक नियोजन विभागातील कनिष्ठ अभियंता पदासाठी परीक्षा घेतली. या परीक्षेचा निकाल शुक्रवारी http://pmc.gov.in/recruitment/re%E2%80%A6 या वेबसाईटवर जाहीर करण्यात आला. परीक्षार्थीना त्यांच्या लॉगइनला मिळालेले गुण पाहाता येणार आहेत.