पुणे : फोन टॅपिंग प्रकरणात शुक्लांबाबत ‘क्लोजर रिपोर्ट’; गुन्हे शाखेकडून न्यायालयात अहवाल सादर | पुढारी

पुणे : फोन टॅपिंग प्रकरणात शुक्लांबाबत ‘क्लोजर रिपोर्ट’; गुन्हे शाखेकडून न्यायालयात अहवाल सादर

पुणे; पुढारी वृत्तसेवा: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शालेय शिक्षण विभागाचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी तत्कालीन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यात आता पुणे पोलिसांकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट (समरी अहवाल) म्हणजे तपास बंद केल्याचा अहवाल दाखल करण्यात आला आहे. याला पुणे पोलिसांनी देखील दुजोरा दिला आहे.

याविषयी अधिक माहिती देण्याचे पोलिसांकडून टाळण्यात आले. शुक्ला यांच्यासह इतरांवर तार अधिनियम कलम 26 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्ला यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलिस ठाण्यात फेब—ुवारी महिन्यात हा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या पोलिस अधिकार्‍यांकडून सुरू होता. या प्रकरणात तत्कालीन तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलिस अधिकारी, कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात आली होती. शुक्ला या पोलिस आयुक्त असताना त्यांच्या कालावधीतच हे प्रकरण घडल्याने त्या वेळी गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तपदाची जबाबदारी सांभाळणार्‍या पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍याची देखील चौकशी करण्यात आली होती. गुन्हे शाखेने फोन टॅपिंग कोणाच्या सांगण्यावरून केले, कोणत्या स्वरूपाची माहिती गोळा केली? याबाबतही चौकशी करण्यात आली होती.

शुक्ला यांनी राजकीय नेत्यांचे फोन बेकायदा टॅप करून त्या फोनमधील संभाषण भाजप-सेना सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना पुरविल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती. उच्चस्तरीय समितीचा अहवाल शासनाने स्वीकारून फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला होता. शुक्ला यांनी पुण्यातील कार्यकाळातही पदाचा गैरवापर करून बेकायदा फोन टॅपिंग केल्याचे अहवालात म्हटले होते. त्यानुसार बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

फोन टॅपिंगसाठी नेत्यांना तस्कर भासविण्याचा प्रयत्न
फोन टॅपिंग प्रकरणात 2021 च्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. 2015 ते 2019 या कालावधीत राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग केल्याचा ठपका शुक्ला यांच्यावर ठेवण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणात 2021 च्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. नेत्यांचे फोन टॅप करताना त्यांच्या नावांसाठी कोडनेम वापरण्यात आले होते. त्यामध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अमजद खान, बच्चू कडू यांच्या नावासमोर निजामुद्दीन बाबू शेख, संजय काकडे यांचे नाव अभिजित नायर, आशिष देशमुख यांचे नाव महेश साळुंके असे ठेवण्यात आले होते. फोन टॅप करण्यासाठी नाव बदलून त्यांना अमली पदार्थ तस्कर असल्याचे भासविण्यात आले होते.

Back to top button