स्वारगेट मेट्रो स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात | पुढारी

स्वारगेट मेट्रो स्थानकाचे काम अंतिम टप्प्यात

ज्ञानेश्वर बिजले
पुणे : स्वारगेट मेट्रो स्थानकाचे 90 टक्के बांधकाम पूर्ण झाले असून, वर्षअखेरीपर्यंत ते पूर्ण होईल. मेट्रो स्थानक पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे महामेट्रोचे नियोजन आहे. हे मेट्रो स्थानक जमिनीखाली चार मजले आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर या ठिकाणी खासगीकरणाच्या माध्यमातून 25 मजली व्यावसायिक इमारत बांधण्यात येणार आहे. मेट्रोतील प्रवाशांना एसटी स्थानकाकडे ये-जा करण्यासाठी भुयारी पादचारी मार्ग बांधण्यात येत आहे.

मेट्रोचा भुयारी मार्ग पूर्ण झाला आहे. येण्यासाठी व जाण्यासाठीच्या दोन्ही मार्गात ट्रॅक टाकण्यास प्रारंभ झाला आहे. पिंपरी-चिंचवड
महापालिका भवनापासून उन्नतमार्गाने फुगेवाडीपर्यंत मेट्रो सेवा सुरू झाली आहे. तेथून ती खडकीमार्गे कृषी महाविद्यालयाच्या मैदानापर्यंत पोहोचेल. त्या ठिकाणी सहा किलोमीटर लांबीचा भुयारी मार्ग सुरू होत आहे. पाच ठिकाणी मेट्रोची भुयारी स्थानके असून, स्वारगेटला शेवटचे स्थानक आहे.

स्वारगेट स्थानकाचे चार मजल्यांचे स्लॅबचे 90 टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. थेट खाली नेण्यासाठीची यंत्रसामुग्री बेसमेंटला पोहोचल्यानंतर उर्वरीत दहा टक्के स्लॅबचे काम करण्यात येईल. मेट्रो स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची उंची नऊ मीटर आहे. त्याची लांबी 180 मीटर आणि रुंदी 24 मीटर आहे. स्थानकाच्या बेसमेंटचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. तेथे प्लॅटफॉर्मच्या दोन्ही बाजूने मेट्रो धावेल. पुढे कात्रजच्या दिशेने काही अंतराचा मार्ग तयार करण्यात आला आहे.

बेसमेंटच्या वरील बाजूला मेझानाईन असून, तेथे मेट्रो चालविण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामग्री बसविण्यात येईल. त्यावरील मजला हा कॉनकोर्स आहे. या मजल्यावर प्रवाशांना मेट्रोचे तिकीट मिळणार आहे. तेथून सरकत्या जिन्याने ते तळमजल्यावरील मेट्रोकडे जाऊ शकतील. कॉनकोर्सच्या वर पादचारी यांच्यासाठी मजला आहे.

प्रवाशांना तेथून पादचारी भुयारी मार्गाने एसटी स्थानक, तसेच गणेश कलाक्रीडा मंच येथे जाता येईल. त्यावरील बाजूला जमिनीलगतचा स्लॅब आहे. सध्या भुयारी मार्गासाठी वॉटर प्रुफींगचे काम करण्यात येत आहे. बांधकाम झाल्यानंतर, तेथे ग्रॅनाईट बसविण्यात येतील. विद्युत यंत्रणा, वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात येईल. लिफ्ट, सरकते जिने बसविण्यात येणार आहेत.

आठ सरकते जिने
स्वारगेट मेट्रो स्थानकाच्या ठिकाणी आठ सरकते जिने (एस्केलेटर) बसविण्यात येणार आहेत. त्यासाठीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. येत्या आठवड्याभरात ते जिने बसविण्याचे काम सुरू होणार आहे. त्याचबरोबर लिफ्टही बसविण्यात येणार असून, त्याचीही पूर्वतयारी झाली आहे. या व्यतिरिक्त जिने बांधण्याचे कामही अंतीम टप्प्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांना मेट्रोपर्यंत ये-जा करणे सुलभ होणार आहे.

स्वारगेट मेट्रो स्थानकाचे 75 टक्के काम पूर्ण झाले आहे. बांधकाम येत्या दोन महिन्यात पूर्ण होईल. त्यानंतर उर्वरीत कामे मार्चपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. सर्व कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.
                                                        – हेमंत सोनवणे,
                                              जनसंपर्क अधिकारी, महामेट्रो.

Back to top button