पुणे : नवरात्रोत्सवात फूलबाजाराला बहर; दहा दिवसांत सोळा कोटींची उलाढाल | पुढारी

पुणे : नवरात्रोत्सवात फूलबाजाराला बहर; दहा दिवसांत सोळा कोटींची उलाढाल

पुणे; पुढारी वृत्तसेवा: घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक फूल बाजारात जिल्ह्यासह राज्याच्या विविध भागांतून तब्बल 15 लाख 93 हजार 400 किलो फुलांची आवक झाली. यामध्ये झेंडूच्या फुलांची सर्वाधिक आवक राहिली. याद्वारे गेल्या दहा दिवसांत बाजारात तब्बल 15 कोटी 93 लाख 76 हजार 100 रुपयांची उलाढाल झाली. नवरात्रोत्सवास सुरवात झाल्यापासून विजयादशमीपर्यंत मार्केट यार्डातील घाऊक फूलबाजारात फुलांची मोठी आवक होते. कोरोनाच्या दोन वर्षानंतर यंदा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार हे लक्षात घेऊन शेतकर्‍यांनीही मोठ्या प्रमाणात फूल झाडांची लागवड केली.

लागवडीत वाढ झाल्याने यंदा बाजारातील आवकही वाढली. बाजारात जिल्ह्यासह सोलापूर, कोल्हापूर, सातारा तसेच मराठवाड्यातील बीड, लातूर, उस्मानाबाद येथून मोठ्या प्रमाणात झेंडूची आवक झाली. यामध्ये नारंगी, पिवळा, कलकत्ता, तुळजापुरी, कापरी आदी झेंडूच्या फुलांचा मोठा प्रमाणात समावेश होता. ऐन नवरात्रोत्सवात पावसाचा तडाखा फुलांना बसला. त्यामुळे जवळपास निम्म्या फुलांच्या प्रतवारीत घसरण झाली. या काळात ओल्या फुलांच्या तुलनेत दर्जेदार फुलांना जास्त दर मिळाल्याचे अखिल फूलबाजार अडते असोसिएशनचे अध्यक्ष अरुण वीर यांनी सांगितले.

फुले आवक (किलोंत) उलाढाल (रुपयांत)
झेंडू 8 लाख 72 हजार 4 कोटी 79 लाख 60 हजार
शेवंती 3 लाख 34 हजार 3 कोटी 17 लाख 30 हजार
गुलछडी 52 हजार 300 1 कोटी 17 लाख 67 हजार 500
अ‍ॅस्टर 36 हजार 800 73 लाख 60 हजार
तुळजापुरी 47 हजार 54 लाख 5 हजार
बिजली 22 हजार 850 21 लाख 70 हजार 750

यंदा बाजारात झेंडूला किलोला 30 ते 100 रुपये दर मिळाला. कोरोनाच्या दोन वर्षानंतर पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात सण साजरा झाल्याने फुलांना चांगला दर मिळाला.त्यामुळे शेतकर्‍यांत आणि खरेदीदारांमध्ये समाधानाचे वातावरण राहिले.

                                                                            – सागर भोसले, फुलांचे व्यापारी

Back to top button