

राजेंद्र खोमणे
नानगाव : बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड तालुक्यावर सध्या भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी करडी नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे येणार्या काळात दौंड तालुक्यात राजकीय वातावरण तापणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. मागील महिन्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला असून, मतदारसंघातील वेगवेगळ्या तालुक्यांतील वेगवेगळ्या गावांत वेगवेगळ्या घटकांशी संपर्क साधला. त्यांच्या अडीअडचणी ऐकून घेतल्या, तर काही नागरिकांनी या वेळी सीतारामन यांना निवेदने देऊन तालुक्यातील वेगवेगळ्या कामांवर लक्ष वेधले.
त्यापाठोपाठ लगेचच बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दौंड तालुक्यातील वेगवेगळ्या गावांत गावभेट दौरा करीत गावागावांतील नागरिकांशी संवाद साधत केलेल्या कामांची माहिती व कामाबद्दल नागरिकांशी संवाद साधला. या वेळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते. केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या दौर्यानंतर लगेचच विरोधी पक्षनेते अजित पवार एका कार्यक्रमाचे औचित्य साधत पारगाव सा. मा. (ता. दौंड) येथे आले होते.
या वेळी त्यांनी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते यांना पुढील निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून काम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधला व नागरिकांच्या अडीअडचणी व कामांविषयी माहिती घेतली. दौंड तालुक्यास एकापाठोपाठ एक भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठमोठ्या दिग्गज नेत्यांनी भेटी दिल्याने सध्या तालुक्यात चांगलीच राजकीय चर्चा सुरू झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपने जोरदार सुरुवात केल्याने अनेक दिवस दौंड तालुक्यात न आलेले अजित पवार हेदेखील येऊन गेल्याने राजकारणाची हवा चांगलीच गरम झाल्याचे दिसून येत आहे.
दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांचा पराभव करीत भाजपचे आमदार राहुल कुल हे पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कमळ फुलवत एकमेव आमदार म्हणून निवडून आले. थोड्या मतांनी रमेश थोरात यांचा पराभव झाल्याने हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला असून, यासंदर्भातील खंत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पारगाव येथे झालेल्या सभेत जाहीरपणे व्यक्त केली. त्यामुळे येणार्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने निवडणुकीत उतरण्याच्या तयारीत दिसत असली, तरी भाजपदेखील तेवढ्याच ताकदीने नियोजन करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्या दौंड तालुक्यावर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसची करडी नजर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सीतारामन यांचा लवकरच पुन्हा दौरा
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती लोकसभा मतदारसंघात लवकरच दुसर्यांदा येणार असल्याची चर्चा सुरू आहे. केंद्रीय अर्थमंत्र्यांचे बारामती मतदारसंघातील वाढते दौरे राष्ट्रवादी काँग्रेसचे टेन्शन वाढविणारे ठरत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.