पुणे: यवतमधून पुन्हा हवालाची २४ लाखांची रोकड लंपास | पुढारी

पुणे: यवतमधून पुन्हा हवालाची २४ लाखांची रोकड लंपास

यवत, पुढारी वृत्तसेवा: यवत गावाच्या हद्दीमधून पुन्हा एकदा हवालाची 24 लाखाची रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवार ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत प्रज्योत रमेश शिंदे (रा. कोराळे, पोस्ट बीबी, ता. फलटण, जि सातारा, सध्या काळाबादेवी मुंबई) यांनी यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, ते गुरुवारी (दि. ६) सकाळी 8 वाजेच्या दरम्यान पुणे-सोलापुर महामार्गावरील यवत गावाच्या हद्दीत इंदापुर-स्वारगेट बस (एमएच 13/सीयु 7246) मध्ये बसलेले होते. यावेळी दोन अनोळखी इसम बसमध्ये चढले. त्यापैकी एकाने अंगात काळे रंगाचे जर्कींन घातलेले होते. त्यातील एका अज्ञाताने तु मुलींची छेड काढतो काय, असे म्हणुन आपल्याला हाताने तसेच लाथाबुक्यांनी मारहाण केली. तर एकाने माझ्याकडील पार्सल बॅग पकडलेल्या हातावर लाथा मारून ती पार्सल बॅग हिसकावुन घेऊन बसमधुन पळ काढला. यामध्ये २४ लाख ३२ हजार ७५० रुपयांची रोख रक्कम होती, असे प्रज्योत शिंदे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. त्यानुसार यवत पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत मदने करीत आहेत.

दरम्यान यापूर्वी देखील मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात यवत पोलिस स्टेशन हद्दीतील पाटस गावातून एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम लुटण्यात आली होती. मागील महिन्यात इंदापूर तालुक्यात अशाच स्वरूपाची घटना घडली होती.

Back to top button