पुणे: कोरोनात प्राण गमवलेल्या कर्मचार्‍यांचे झेडपीत स्मारक, 35 जणांच्या आठवणीसाठी उभारले जाणार स्मृतीस्थळ | पुढारी

पुणे: कोरोनात प्राण गमवलेल्या कर्मचार्‍यांचे झेडपीत स्मारक, 35 जणांच्या आठवणीसाठी उभारले जाणार स्मृतीस्थळ

पुणे, पुढारी वृत्तसेवा: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचे अधिकारी, कर्मचारी अहोरात्र काम करत होते. हे काम करतानाच अनेकांना कोरोनानी गाठले आणि त्यातील 35 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यांची नेहमी आठवण राहावी, त्यांचे काम इतरांना प्रेरणादायी ठरावे, यासाठी जिल्हा परिषदेने स्मारक तयार करण्याचे ठरवले आहे.

राष्ट्रसेवेत असताना प्राण गमावलेल्या जवानांच्या स्मरणार्थ अशी स्मारके बांधली आहेत. त्याच धर्तीवर हे स्मारक असणार आहे. या स्मारकाचा आराखडा अंतिम करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी समितीची स्थापना केली आहे. ही समिती जिल्हा परिषद परिसरातील सार्वजनिक जमिनीचा वापर करण्यासाठी राज्य सरकार, जिल्हाधिकारी, पुणे महापालिका आणि शहर पोलिसांकडून सर्व परवानग्या घेणार आहे. या परवानग्या घेतल्यानंतर हे बांधकाम सुरू करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेतून कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीमध्ये प्रत्येक विभातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना जबाबदाऱ्या निश्चित करून दिल्या होत्या. त्यामध्ये माहिती संकलनापासून ते थेट रुग्णालयात जाऊन काहींना नोंदी ठेवण्याचे काम सोपवले होते. याशिवाय ऑक्सिजन नियोजन, बेड नियोजन, आपत्कालीन परिस्थितीत तयार असलेले कर्मचारी आणि प्रत्यक्ष फिल्डवर आणि कार्यालयातून नियमित काम बघण्याची जबाबदारी अनेकांवर सोपवली होती. कोरोना काळात जिल्हा परिषदेतील 35 कर्मचारी आणि अधिकार्‍यांपैकी बहुतांश जण एकतर रुग्णालयात सेवा देत होते किंवा आरोग्य विस्तार सेवा प्रदान करत होते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात हे सर्व सक्रिय कर्तव्यावर होते. त्यांच्या प्रयत्नांमुळेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात मृत्यूदर कमी झाला. परिणामी जिल्हा परिषद प्रशासनाला अनेकांचे जीव वाचले.

जिल्हा परिषदेतील या कोरोना वॉरियर्सचे स्मारक करावे की स्मृतीफलक करावे, याबाबत ही समिती ठरवणार आहे. त्याबाबत लवकरच मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.
– कमलाकर रणदिवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) जि.प.

Back to top button