मोशी-तापकीरनगरमध्ये सांडपाण्याची समस्या गंभीर | पुढारी

मोशी-तापकीरनगरमध्ये सांडपाण्याची समस्या गंभीर

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : मोशी-तापकीरनगर येथील साईकृपा कॉलनीमध्ये सांडपाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. बंदिस्त सांडपाण नलिका नसल्याने रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरामध्ये सध्या डेंग्यूची रुग्णसंख्या वाढली आहे. त्यामुळे अनेक नागरिक आजारी पडत आहेत. मोशी येथे जाणार्‍या मैलामिश्रित पाण्यासाठी सांडपाणी नलिका टाकण्यासाठी खासगी जागेतून जावे लागते. त्यासाठी खासगी जागामालकाचा विरोध आहे. हे न्यायप्रविष्ट प्रकरण असल्यामुळे महापालिकेने पर्यायी जागेची निवड करून त्या ठिकाणाहून बंदिस्त सांडपाणी नलिका टाकावी, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड यांनी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

पर्यायी व्यवस्था करा
संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर म्हणाले, हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, असे सांगून महापालिकेने पळ न काढता ताबडतोब उपाययोजना कराव्यात. भारतीय संविधानाच्या आर्टिकल 21 नुसार जीविताच्या हक्कात स्वच्छ व आरोग्यदायी पर्यावरणाच्या मूलभूत हक्काचा समावेश होतो. त्याचा महापालिकेने गांभीर्याने विचार करून पर्यायी व्यवस्था करावी.

नागरिकांचाही पत्रव्यवहार
आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांनी या नागरी समस्येकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण जागृतीच्या वतीने करण्यात आली आहे. स्थानिक नागरिक अहमद मुजावर, कालिदास शिरसाट, अशोक हडवले, ज्ञानेश्वर गोरे यांनीही याबाबत पालिकेशी पत्रव्यवहार केला आहे.

आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांचे दुर्लक्ष
महिला अध्यक्षा मीना करंजावणे म्हणाल्या, ‘केंद्र सरकारच्या स्वच्छता क्रमवारीत पिंपरी चिंचवड शहराचा देशात 19 वा तर राज्यात चौथा क्रमांक लागला आहे. तर 10 ते 40 लाख लोकसंख्या असलेल्या शहराच्या विभागात सर्वोत्तम नागरिक अभिप्रायाबद्दल देशात प्रथम क्रमांक लागला आहे. ही बाब पिंपरी चिंचवड शहरासाठी भूषणावह आहे. पण याच शहरात आरोग्य विभाग तेवढ्याच ताकदीने सांडपाणी नलिकेचा प्रश्न सोडवत नाही, ही बाब गंभीर आहे.

Back to top button