लोणावळा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकाला अटक | पुढारी

लोणावळा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एकाला अटक

लोणावळा : पुढारी वृत्तसेवा : नेपाळ येथून पोटपाण्यासाठी लोणावळ्यात आलेल्या कुटुंबातील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या नात्यातील व्यक्तीकडून दारू पाजून अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तात्काळ आरोपीला जेरबंद केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 4) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लोणावळा शहराजवळ असलेल्या वरसोली याठिकाणी ही घटना घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे.

शंकर पानसिंग बहाद्दूर थापा (वय 24, सध्या रा. वरसोली, ता. मावळ, मूळ रा. शिवडी, पो. चौरपाटी, जि. अझाम, नेपाळ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. आरोपी शंकर याने पीडित मुलगी आणि तिचा 7 वर्षीय भाऊ यांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी म्हणून घरातून बाहेर नेले. त्यानंतर त्यांना एका पडीक जमिनीवर घेऊन जाऊन पीडित मुलीला त्याठिकाणी दारू पाजून तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. या घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे या करीत आहेत.

Back to top button