

कार्ला : मुंढावरे येथील वेट एन जॉय वॉटरपार्कच्या विरोधात मावळातील भूमिपुत्रांचे गेल्या सात दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. तरीही या 22 कामगारांना कामावर घेतले नसल्यामुळे कामगारांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. नोकरी गेल्यामुळे मावळातील युवक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे मागील सात दिवसांपासून कामगार आंदोलन करत आहेत. तरीही भूमिपुत्रांना न्याय अद्याप मिळाला नाही.
या आंदोलकांच्या न्याय हक्कासाठी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले होते. या युवकांना दोन दिवसांत न्याय न मिळाल्यास उपोषण करणार असल्याचे संजय गांधी निराधार योजनेचे माजी अध्यक्ष किरण राक्षे व भाजप कामगार आघाडीचे अध्यक्ष अमोल भेगडे यांनी सांगितले. या वेळी भाजयुमोचे अध्यक्ष संदीप काकडे, भाजप विद्यार्थी आघाडीचे तालुकाध्यक्ष अभिमन्यू शिंदे, गणेश ठाकर, शेखर वाघमारे, बाळासाहेब वाघमारे उपस्थित होते.