पिंपरी : बालवयातच चष्मा ? अशाप्रकारे घ्या मुलांच्या डोळ्याची काळजी | पुढारी

पिंपरी : बालवयातच चष्मा ? अशाप्रकारे घ्या मुलांच्या डोळ्याची काळजी

दीपेश सुराणा :

पिंपरी : महापालिका शाळांमध्ये सध्या सुरू असलेल्या नेत्र तपासणीत आत्तापर्यंत 4 हजार विद्यार्थ्यांचे डोळे तपासण्यात आले आहे. त्यामध्ये 400 मुलांना म्हणजे 10 टक्के मुलांना चष्मा लागल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या कालावधीत ऑनलाइन अभ्यासामुळे मुलांचा बराच वेळ मोबाइलवर जात होता. अभ्यासाबरोबरच मुले मोबाईलवर विविध गेम्स खेळू लागली. छोटे व्हिडीओ (रील्स), कार्टून फिल्म्स पाहण्यात त्यांचा बराच वेळ जाऊ लागला आहे. यामुळे त्यांचे मनोरंजन होत असताना डोळ्यांचे आरोग्य मात्र बिघडू लागले आहे. महापालिकेच्या 128 शाळांमध्ये सध्या विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी केली जात आहे. 1 सप्टेंबरपासून तपासणीला सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील 3 एमएस डॉक्टर, 2 ऑप्टिमेट्रिस्ट अशा एकूण 5 जणांचे पथक दररोज 250 विद्यार्थ्यांची तपासणी करत आहे. एकूण 60 हजार विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी केली जाणार आहे.

मुलांचे डोळे तपासून घ्या
जर तुमच्या मुलाला शाळेतील फळ्यावर नीट दिसत नसेल, डोळे सतत दुखत असल्याची तक्रार असेल तर त्यांचे डोळे तपासून घ्यायला हवे. तसेच, त्याला चष्मा लागला असेल तर तो बसवून घ्यावा. मुलांमध्ये छोट्या वयात चष्मा लागल्याने न्यूनगंड निर्माण होऊ नये, यासाठी मुलांशी सकारात्मक बोलावे.

डोळ्यांची काळजी कशी घ्याल ?
मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर कमी करावा.
सतत मोबाईलच्या स्क्रीनकडे न पाहता प्रत्येक 20 मिनिटांनंतर दुसरीकडे पाहावे. डोळ्यांच्या पापण्यांची कमीत कमी 20 वेळा उघडझाप करावी. दिवसातून दोन-तीन वेळा थंड पाण्याने डोळे धुवावे. किमान 8 तास झोप गरजेची आहे.

डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहार
आहारातील जंकफूडचे प्रमाण कमी करावे. हिरव्या पालेभाज्या, दूध, पपई, संत्री, मोसंबी, केळी, लिंबू, गाजर, शेवग्याच्या शेंगा आदींचा आहारात समावेश करावा.

महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांची सध्या नेत्र तपासणी सुरू आहे. तपासणी केलेल्या एकूण मुलांपैकी 10 टक्के मुलांना चष्मा लागला आहे. पालकांनी मुलांच्या डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. मुलांना चष्मा लागला असल्यास तो वेळीच बसवून घ्यावा. चष्मा लागला असताना न वापरल्यास डोळ्यातील मागच्या पडद्याची व्यवस्थित वाढ होत नाही. पर्यायाने रिफ्रॅक्टेन आम्लायोपिया हा आजार होऊ शकतो, तसेच चष्मा नियमित वापरल्यास डोळ्यांची दृष्टी चांगली राहते.
                   – डॉ. रूपाली महेशगौरी, नेत्ररोग विभागप्रमुख, वायसीएम रुग्णालय.

Back to top button