वाल्हे येथे पारंपरिक पद्धतीने दसरा उत्साहात साजरा | पुढारी

वाल्हे येथे पारंपरिक पद्धतीने दसरा उत्साहात साजरा

वाल्हे; पुढारी वृत्तसेवा: दसरा हा सण मोठ्या उत्साहामध्ये पारंपरिक सीमोल्लंघन, तसेच गुलालाची मुक्त उधळण करीत ‘नाथसाहेबाचं चांगभलं‘च्या जयघोषात साजरा करण्यात आला. बुधवारी (दि. 5) सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान संत सावता माळी मंदिरापासून ग्रामदैवत असलेल्या श्री भैरवनाथांची काठी व पालखीची ढोल-ताशा व सनईच्या गजरात छबिन्यासह मुख्य बाजारपेठेतून ग्रामप्रदक्षिणेसाठी गेली. यानंतर भैरवनाथांची आरती व मंदिर प्रदक्षिणा करून कावड, पालख्या पुणे-पंढरपूर महामार्गावर गावच्या वेशीवर नेण्यात आल्या. यानंतर महर्षी वाल्मीकी विद्यालयात गावचे मुलकी पाटील गिरीश पवार, विष्णू पवार, नारायण पवार यांच्या हस्ते सोने (आपट्याची पाने) पूजन करण्यात आले.

यावेळी ग्रामदैवतेचे पूजन, पालख्यांची भेट, पारंपरिक सीमोल्लंघन तसेच गुलालाची मुक्त उधळण करत ‘नाथसाहेबांचं चांगभलं‘च्या जयघोषात पारंपरिक सीमोल्लंघन व आपट्याच्या पानांची लूट करण्यात आली. यावेळी श्री भैरवनाथ, भवानी माता, मसनेर, लक्ष्मी आई, काळभैरवनाथ, कानिफनाथ, सिध्दनाथ आदी देवांच्या पालख्यांचा समावेश होता. यानंतर ग्रामस्थांनी पारंपरिक सीमोल्लंघन करून सोने (आपट्याची पाने) लुटत पारंपरिक पद्धतीने दसरा सण उत्साहात साजरा केला.

यावेळी भैरवनाथ ट्रस्टचे अध्यक्ष संदेश शिर्के, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, ट्रस्टचे उपाध्यक्ष दत्तात्रय पवार, सरपंच अमोल खवले, भाजपचे ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सचिन लंबाते, आडाचीवाडी गावचे सरपंच दत्तात्रय पवार व देवस्थान संचालक मंडळाचे साहेबराव पवार, शशिकांत दाते, बाळासाहेब भुजबळ, सूर्यकांत भुजबळ तसेच छबिना मानकरी, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. जेजुरीचे पोलिस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे पोलिस दूरक्षेत्रातील पोलिस हवालदार केशव जगताप, संतोष मदने, घनश्याम चव्हाण आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Back to top button