केसनंद येथे सराईत चोरट्यास अटक | पुढारी

केसनंद येथे सराईत चोरट्यास अटक

केसनंद; पुढारी वृत्तसेवा: एका सराईत चोरट्यास लोणीकंद पोलिसांच्या पथकाने केसनंद रस्त्यावरील एका मिसळीच्या दुकानाजवळून अटक केली. त्याच्याकडून 7 गुन्ह्यांची उकल करून 6 दुचाकी व घरफोडीतील मुद्देमाल असा एकूण 2 लाख 77 हजार 734 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे. लोकेश रवि पाटील (वय 22, रा. पाटील वस्ती, केसनंद) असे या दुचाकी चोरीप्रकरणी अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, लोणीकंद ठाण्याच्या हद्दीत वारंवार घडणार्‍या घरफोडी व दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करणार्या पथकास घरफोडीतील सराईत आरोपी केसनंद येथे येणार असल्याची माहिती मिळाली. केसनंद रस्त्यावर नाकाबंदी करून त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने वाहन चोरी व घरफोडीची कबुली दिली.

Back to top button