यात्रा, गाळप हंगामापूर्वी रस्ता दुरुस्त करा; रुई परिसरातील नागरिकांसह प्रवाशांची मागणी | पुढारी

यात्रा, गाळप हंगामापूर्वी रस्ता दुरुस्त करा; रुई परिसरातील नागरिकांसह प्रवाशांची मागणी

कळस; पुढारी वृत्तसेवा: रुई येथील श्री बाबीर देवाची यात्रा महिनाभरावर येऊन ठेपली आहे. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम ही लवकरच आहे. दोन्ही घटनांपूर्वी प्रशासनाने गावाकडे येणार्‍या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी पंचक्रोशीतील ग्रामस्थ करत आहेत.
यात्रेसाठी येणार्‍या भाविकांची संख्या विचारात घेता वाहतुकीच्या समस्येवर तोडगा काढण्याची गरज आहे. सध्या गावात येणार्‍या रस्त्यांची मोठी दुरवस्था झाल्याने, यात्रा काळात भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. रुई-कळस रस्त्यावरील पूल धोकादायक स्थितीत असल्याने येथे गंभीर अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पुलाचे काम मार्गी लावण्याची गरज असल्याचे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

दरवर्षी या यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपर्‍यातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. यामुळे यात्रेसाठी येणार्‍या वाहनांची संख्या हजारोंच्या घरात असते. दोन वर्षे कोरोना प्रार्दुभावामुळे यात्रा भरविण्यात आली नव्हती. यंदा मात्र यात्रा जोमाने भरणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. यामुळे यात्रेसाठी येणार्‍या भाविकांची संख्यांही लाखोंच्या घरात असणार हे नाकारून चालणार नाही. परिणामी, लाखोंच्या संख्येने येणार्‍या भाविकांची येथे सोय व्हावी या दृष्टिकोनातून येथे आताच नियोजन करणे गरजेचे आहे.

पुणे-सोलापूर महामार्गाने आल्यानंतर काळेवाडी येथून तर कळस व लोणी-देवकर येथून रुई गावात येण्यासाठी रस्ते आहेत. गावाच्या चारही बाजूने गावात येणारे मार्ग असल्याने, यात्रा काळात हे रस्ते वाहतुकीने फुलून गेलेले असतात. याच मार्गाने ऊस वाहतूकही मोठ्या प्रमाणावर केली जाते. सध्या मात्र या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांची दुरुस्ती, गावापासून मंदिरापर्यंत जाणार्‍या रस्त्यालगतच्या परिसराची स्वच्छता, अतिक्रमण काढणे महत्त्वाचे आहे. पार्किंगसाठी जागा, मंदिरापासून बाहेर निघण्यासाठी खडकवासला कालव्यालगत पर्यायी रस्ता तयार करणे महत्त्वाचे आहे, असे ग्रामस्थांचे मत आहे.

Back to top button