माळेगावचा उच्चांकी गाळपाचा निर्धार: अध्यक्ष तावरे यांचे प्रतिपादन | पुढारी

माळेगावचा उच्चांकी गाळपाचा निर्धार: अध्यक्ष तावरे यांचे प्रतिपादन

शिवनगर; पुढारी वृत्तसेवा: माळेगाव सहकारी साखर कारखान्याने मागील गाळप हंगामात उच्चांकी गाळप केले. त्याप्रमाणे येऊ घातलेल्या गाळप हंगामातदेखील उच्चांकी गाळप करण्याचा निर्धार कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी व्यक्त केला.
माळेगाव साखर कारखान्याचे बॉयलर अग्निप्रदीपन बुधवारी (दि. 5) दसर्‍याच्या मुहूर्तावर कारखान्याचे उपाध्यक्ष सागर जाधव आणि त्यांच्या पत्नी मीनल जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संचालक रंजन तावरे, अ‍ॅड. केशवबापू जगताप, सुरेश खलाटे, तानाजी कोकरे, योगेश जगताप, नितीन सातव, राजेंद्र ढवाण, अनिल तावरे, तानाजी देवकाते, संजय काटे, स्वप्निल जगताप, मंगेश जगताप, संगीता कोकरे, अलका पोंदकुले, कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप, फॅक्टरी मॅनेजर अनिल वाबळे, चिफ केमिस्ट विकास फडतरे, मुख्य लेखापाल तुकाराम देवकाते आदींसह सभासद, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते

अध्यक्ष तावरे म्हणाले, माळेगाव कारखान्याने मागील गाळप हंगामात उपपदार्थांसह साखरेचे उच्चांकी उत्पादन घेतले होते. त्याचप्रमाणे यंदाही अधिकचे उत्पादन घेण्याचा मानस आहे. कारखाना अंतर्गत हंगामपूर्व सर्व कामांना वेग आला असून अधिकतर कामे पूर्ण झाली आहेत. कारखान्याच्या माध्यमातून अधिकचे उत्पादन घेण्यासाठी सभासद तसेच अधिकारी आणि कामगार यांनी सहकार्य करण्याची अपेक्षा तावरे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, ऊस वाहतूकदार आणि ऊस तोडणी कामगार यांच्याबरोबर विचारविनिमय करून ऊस तोडणी आणि वाहतुकीचे नियोजन केले आहे. याकामी ट्रक, ट्रॅक्टर- ट्रेलर, ट्रॅक्टर गाडी, बैलगाडी आदींचे करार केले असल्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र जगताप यांनी नमूद केले. यावेळी ज्येष्ठ संचालक मदननाना देवकाते यांनी कारखान्याच्या कामाचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे नियोजन कार्यालयीन अधीक्षक जवाहर सस्ते यांनी केले, तर स्टोअर कीपर सुरेश देवकाते यांनी आभार मानले.

Back to top button