भवानीनगर : उतारा वाढवून ज्यादा एफआरपीचा प्रयत्न: अध्यक्ष प्रशांत काटे यांचे प्रतिपादन | पुढारी

भवानीनगर : उतारा वाढवून ज्यादा एफआरपीचा प्रयत्न: अध्यक्ष प्रशांत काटे यांचे प्रतिपादन

भवानीनगर; पुढारी वृत्तसेवा: श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा सरासरी साखर उतारा वाढवून उसाची एफआरपी वाढवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी केले. कारखान्याचा 67 वा बॉयलर अग्निप्रदीपन व गव्हाण पूजन कार्यक्रम दसर्‍याच्या मुहूर्तावर बुधवारी (दि. 5) सकाळी अकरा वाजता पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे संचालक बाळासाहेब महादेव सपकळ व त्यांच्या पत्नी मंदाकिनी सपकळ, कुंदन दत्तात्रय देवकाते पाटील व त्यांच्या पत्नी संचालिका तेजश्री देवकाते पाटील यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदिपण करण्यात आले.

या वेळी कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील, साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश घोलप, बाळासाहेब पाटील, रणजित निंबाळकर, सर्जेराव जामदार, रसिक सरक, नारायण कोळेकर, राजेंद्र गावडे, दत्तात्रय सपकळ, अभिजित रणवरे, गोपीचंद शिंदे, सणसर सोसायटीचे अध्यक्ष परशुराम रायते, सरपंच पार्थ निंबाळकर, अभयसिंह निंबाळकर, कार्यकारी संचालक अशोक जाधव, हनुमंत करवर, कामगार नेते युवराज रणवरे आदींसह संचालक, सभासद व कामगार उपस्थित होते.

अध्यक्ष काटे म्हणाले, सभासदांना जादा साखर उतारा देणार्‍या उसाच्या जातींची लागवड करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. कार्यक्षेत्रात 265 या उसाच्या जातीपेक्षा 86032 या साखर उतारा अधिक असणार्‍या उसाच्या जातीची सभासदांनी 64 टक्क्यांपर्यंत लागण केली आहे. त्यामुळे सरासरी साखर उतार्‍यामध्ये यावर्षीपासून वाढ दिसणार आहे. साखरेचे उत्पादन करताना मळी व बगॅसमध्ये साखर जाणार नाही याची दक्षता घेतली जाणार आहे. सरासरी साखर उतारा वाढल्यास उसाच्या भावातदेखील वाढ होण्यास मदत होणार आहे.

गेल्या वर्षी ऊस तोडीसाठी सभासदांना त्रास सहन करावा लागला, यंदा तो होणार नाही. सभासदांच्या आडसाली उसाचे संपूर्ण गाळप करूनच गेटकेन उसाच्या गाळपाचे नियोजन करण्यात येणार आहे. सभासदांनी आपल्याच कारखान्याला गाळपासाठी जास्तीत जास्त ऊस देऊन सहकार्य करावे. कारखान्याच्या दोन्ही प्रकल्पाचा गाळप हंगाम 15 ऑक्टोबरला सुरू करण्याचा प्रयत्न आहे.

पृथ्वीराज जाचक म्हणाले, चांगला भाव व बोनस देणे हे संचालक मंडळाचे कर्तव्य आहे. कामगारांनादेखील चांगला बोनस मिळाला पाहिजे. उसाच्या भावात सभासदांना सातत्याने पाचशे रुपयांचा फटका बसला आहे. छत्रपती कारखाना हा आपल्या काळजात आहे हे साहेबांना, दादांना देखील माहिती आहे. त्यामुळे कारखान्यासाठी आपण शेवटपर्यंत मागे हटणार नाही.

एफआरपीचा साडेआठ रिकव्हरीचा बेस सव्वादहा टक्क्यावर नेल्यामुळे ऊस उत्पादकांना वाढीव एफआरपीचा काहीच फायदा होत नाही. गेटकेन उसाचे गाळप करण्यासाठी कारखाना वाढवायचा हे दुष्टचक्र आहे. पालखी मार्ग कारखान्यापासून वळवण्यासाठी लवकर पाठपुरावा करण्याची गरज आहे.

 

Back to top button