पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचार्‍यांची दिवाळी ‘गोड’ | पुढारी

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचार्‍यांची दिवाळी ‘गोड’

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : ‘श्रीमंत’ समजल्या जाणार्‍या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील तब्बल 7 हजार 84 अधिकारी व कर्मचार्‍यांची दिवाळी गोड होणार आहे. दिवाळीसाठी 8.33 टक्के बोनस व 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान दिले जाणार आहे. ती एकूण रक्कम तब्बल 60 कोटी इतकी आहे. कर्मचार्‍यांबरोबरच शिक्षक व बालवाडी शिक्षकांना देखील हा लाभ दिला जाणार आहे. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी बोनस व सानुग्रह अनुदानाबाबत गुरुवारी (दि.6) आदेश काढला आहे.

औद्योगिक कायद्यानुसार पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघ व महापालिका यांच्यात सन 2020-21 मध्ये अधिकारी, कर्मचार्‍यांना 8.33 टक्के बोनस व 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याबाबत 5 वर्षांचा करार झाला आहे. त्यानुसार, हा बोनस दरवर्षी दिला जातो. महापालिका आस्थापनेवर सुमारे सात हजार 84 अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. तर बालवाडी, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची संख्या सुमारे दीड हजार आहे. पालिकेतील सर्व वर्ग 1 ते 4 मधील अधिकारी व कर्मचार्‍यांना तसेच, रजा राखीव वैद्यकीय अधिकारी व रजा राखीव परिचारिकांना 8.33 टक्के प्रथा बोनस व 20 हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे.

याचा लाभ पालिकेत मानधन तत्त्वावर काम करणार्‍या वैद्यकीय अधिकारी, राखीव नर्सेस, शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी, समूहसंघटक यांना होणार आहे.बोनस व सानुग्रह अनुदानाची रक्कम सर्व कर्मचार्‍यांना दिवाळीपूर्वी मिळेल याची दक्षता घ्यावी. त्याबाबतची बिले तयार करून तातडीने लेखा विभागाकडे सादर करावीत, असे आदेश आयुक्त सिंह यांनी विभागप्रमुखांना दिले आहेत.

Back to top button