पिंपरी : सराफ बाजारात कोट्यवधींची उलाढाल ; फ्लॅट खरेदीला अल्प प्रतिसाद, दरवाढीचा परिणाम | पुढारी

पिंपरी : सराफ बाजारात कोट्यवधींची उलाढाल ; फ्लॅट खरेदीला अल्प प्रतिसाद, दरवाढीचा परिणाम

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : विजयादशमीनिमित्त (दसरा) बुधवारी शहरातील सराफ बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. तर, वाहनांच्या बाजारपेठेतदेखील लाखो रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती मिळाली. तुलनेत फ्लॅट खरेदीला मात्र अल्प प्रतिसाद मिळाल्याची माहिती बांधकाम व्यावसायिकांनी दिली. बँकांचे कर्जाचे वाढलेले दर, बांधकाम खर्चात झालेली वाढ आदी प्रमुख कारणांमुळे फ्लॅटचे दर वाढले असल्याची माहिती देण्यात आली.

सराफ बाजारात 50 कोटींची उलाढाल
यंदाचा दसरा शहरातील सराफा बाजारासाठी लाभदायक ठरला. दिवसभरात सुमारे 50 कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती सराफ व्यावसायिक दिलीप सोनिगरा यांनी दिली.

वाहनांमध्ये लाखोंची खरेदी
दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांची लाखो रुपयांची खरेदी दसर्‍याच्या मुहूर्तावर झाली. चारचाकी वाहनांमध्ये 8 ते 25 लाखदरम्यान विक्री किंमत असलेल्या वाहनांची मागणी गतवर्षीच्या तुलनेत 35 टक्के वाढली. तसेच दुचाकी वाहनांच्या विक्रीत गतवर्षीच्या तुलनेत 20 टक्के वाढ झाली. तीनचाकी रिक्षांचीदेखील खरेदी करण्यात आली असल्याची माहिती विक्रेते सुनील बर्गे यांनी दिली. रिक्षांच्या मागणीत 25 ते 30 टक्के वाढ झाली. पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची गतवर्षीच्या तुलनेत मागणी तिप्पट वाढली असल्याची माहिती विक्रेते मनीष मोहिते यांनी दिली.

फ्लॅट खरेदीला मात्र अल्प प्रतिसाद
फ्लॅट खरेदीला मात्र दसर्‍याच्या मुहूर्तावर अल्प प्रतिसाद मिळाला आहे. फ्लॅट बुकिंगचे प्रमाण 5 ते 6 टक्केच राहिल्याची माहिती बांधकाम व्यावसायिक किरण सावंत यांनी दिली. बांधकाम व्यावसायिक गणेश पाटील यांनीही यंदा प्रतिसाद घटल्याचे सांगितले.

कोरोनाचा दोन वर्षांचा कालखंड उलटल्यानंतर यंदा दसरा सणाच्या दिवशी सराफ बाजारात उत्साह पाहण्यास मिळाला. मागच्या वर्षीच्या तुलनेत सोन्याच्या खरेदीमध्ये 15 टक्के वाढ झाली आहे. कमी वजनाच्या दागिन्यांच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळाला.
                                                    – राहुल चोपडा, सराफ व्यावसायिक

गतवर्षीच्या तुलनेत सोन्याच्या दरामध्ये यंदा पाच टक्के वाढ झाली आहे. तथापि, यंदा सोन्याच्या खरेदीत गतवर्षीच्या तुलनेत 10 ते 15 टक्के वाढ झाली. सोन्यामध्ये टेंपल, अ‍ॅन्टिक ज्वेलरी, बिस्कीट, वेढणी आदींना मागणी होती. तर, चांदीमध्ये पूजेचे साहित्य, पैंजण आदींना चांगली मागणी होती.
                                        – दिलीप सोनिगरा, सराफ व्यावसायिक

Back to top button