पुणे : हनुमान टेकडीवर मोरांचा केकारव; वन्यजीव सप्ताह विशेष | पुढारी

पुणे : हनुमान टेकडीवर मोरांचा केकारव; वन्यजीव सप्ताह विशेष

पुणे; पुढारी वृत्तसेवा: शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या हनुमान टेकडीवर मोरांचे प्रमाण अधिक असून, त्यांच्यामुळे टेकडीचे सौंदर्य वाढले आहे. मोराबरोबरच याठिकाणी ससे आणि सापही आढळून येतात. पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आणि सिंबायायोसिस संस्थेच्या लगतच ही टेकडी आहे. यावर प्रामुख्याने नागरिक सकाळी मॉर्निंग वॉकसाठी येत असतात. पूर्वी हनुमान टेकडीवर वृक्षांचे प्रमाण अधिक होते. परंतु, वाढत्या शहरीकरणामुळे हनुमान टेकडीचा मूळचा असलेला पसारा कमी झालेला आहे. मात्र, अद्यापही या टेकडीवर लिंब, पिंपळ, बकुळ, बांबू आदी वृक्ष आढळून येतात.

पुण्यातील बहुसंख्य नागरिक या टेकडीवर सकाळी किंवा संध्याकळी एकदा तरी फेरफटका मारतात. पुणे वनविभागाच्या अखत्यारीत असलेल्या या टेकडीवर वनविभागाच्या वतीने नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस व चालण्यासाठी भ्रमण मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. या टेकडीवर प्रामुख्याने मोर व सर्प आढळून येत आहेत. शहरीकरणाच्या रेट्यामुळे अनेक पक्षी नामशेष झालेले आहेत. तसेच, या टेकडीवर ठराविक कालावधीत येणारे परदेशी पक्षीही आता दिसेनासे झाले आहेत.

जैवविविधतेच्या बाबतीत ही टेकडी विविधटेतेने नटलेली आहे. विविध प्रकारच्या वनस्पती, झाडे इथे दिसतात. वनविभागाच्या वतीने या टेकडीवर वनउद्यान किवा वनप्रेमींसाठी उद्यान उभारण्याचा प्रस्ताव आहे. यामध्ये प्रामुख्याने बांबू उद्यान, फुलपाखरू वनउद्यान, तसेच विविध देशी वृक्षांची लागवड करून टेकडीचे सौंदर्य टिकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. टेकडीवर महिन्याच्या पहिल्या शनिवारी क्लीन हिल अभियानच्या माध्यमातून विविध स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून टेकडी स्वच्छ्ता मोहिमेचा कार्यक्रम राबविला जात आहे.

Back to top button