पुणे : भाजप मुख्यमंत्र्यांना अंतर देणार नाही : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत | पुढारी

पुणे : भाजप मुख्यमंत्र्यांना अंतर देणार नाही : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत

पुणे; पुढारी वृत्तसेवा: एकनाथ शिंदे 40 आमदारांना घेऊन भाजपसोबत आले. भाजप त्यांना कधीही अंतर देणार नाही. भाजप कायम साथ देईल, त्यांची शिवसेना आणि भाजप युती म्हणून निवडणूक लढवेल, असे मत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पक्षातर्फे पुण्याचे पालकमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते पाटील यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी आमदार बाळा भेगडे, योगेश टिळेकर, बापू पठारे, धीरज घाटे, हेमंत रासने, गणेश बीडकर, ज्येष्ठ विधिज्ञ एस. के. जैन आदी उपस्थित होते. प्रमोद कोंढरे यांनी सूत्रसंचालन केले.

पाटील म्हणाले, की आगामी महापालिका निवडणुकीत आपण शंभरहून अधिक जागा जिंकल्या, तरच महापालिका जिंकली, असे मी मानेन. यासाठी भांडाभांडी न करता सर्वांनी संकल्प म्हणून काम करा. आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याला तयारी करायची आहे. पालकमंत्री म्हणून मी जिल्हा पिंजून काढणार आहे. राज्यात आपले सरकार येण्यामध्ये कमी पडलेल्या जागांची कमतरता भरून काढण्याची ताकद पुणे जिल्ह्यात आहे.

पालकमंत्री म्हणून स्वच्छ, सुंदर, सक्षम, सधन, समाधानी आणि सुरक्षित पुण्यासाठी मी काम करेन. पुणे महापालिकेत रस्ते, पाण्याचा प्रश्न, जायका प्रकल्प, मेट्रो, रिंग रोड अशी अनेक कामे करायची आहेत. विद्यापीठांमधील राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्यांची नावे, 130 महामंडळांच्या नियुक्त्या करायच्या आहेत. त्यासाठी आपल्या पक्षातील किंवा बाहेरच्या तज्ज्ञ व्यक्तींची नावे, बायोडेटा तयार ठेवा, अशी सूचनाही पाटील यांनी केली. माझ्या कार्यक्रमासाठी अनधिकृत फ्लेक्स लावू नका, फटाके लावू नका, नाहीतर मी कार्यक्रमाला येणार नाही, असेही पाटील म्हणाले.

राज्यात विधानसभा निवडणुका ऑक्टोबर 2024 मध्ये होतील. आचारसंहितेचा विचार करता आपल्याकडे 18 महिने आहेत. या सत्ताकाळात आपल्याला खूप काम करायचे आहे. विकासाच्या आधारावर निवडणूक लढवायची आहे. राज्यात आपले सरकार आले आहे. मात्र, अनेक आव्हाने आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना केलेले काम महाविकास आघाडी सरकारने धुळीस मिळवले. सोशल मीडियावरील पोस्टसाठी कार्यकर्त्यांना अटक केली. असे असले, तरी भाजपचे कार्यकर्ते टिकून राहिले, असे पाटील या वेळी म्हणाले.

Back to top button