पुणे; पुढारी वृत्तसेवा: नगर रस्ता भागातून दुचाकी लांबविणार्या चोरट्याला लोणीकंद पोलिसांनी पकडले. चोरट्याकडून घरफोडी तसेच वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे. त्याच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. लोकेश रवी पाटील (वय 22, रा. केसनंद, नगर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पाटील सराईत चोरटा आहे. त्याने नगर रस्ता भागातून दुचाकी लांबविल्या होत्या, तसेच घरफोडीचा गुन्हा केला होता.
तो केसनंद परिसरात थांबल्याची माहिती लोणीकंद पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. चौकशीत त्याच्याकडे असलेल्या दुचाकी चोरीची असल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडून सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. पाटील याच्याकडून घरफोडीच्या गुन्ह्यातील पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीकंद पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन पवार, बाळासाहेब सकाटे, अजित फरांदे, स्वप्नील जाधव, विनायक साळवे आदींनी ही कारवाई केली.