

पुणे; पुढारी वृत्तसेवा: उद्यानात गप्पा मारत बसलेल्या नागरिकांना लोखंडी तलवार व चाकूने मारहाण करत जबरदस्तीने त्यांच्याकडील मोबाईल हिसकावून पसार झालेल्या टोळीला वानवडी पोलिसांच्या पथकाने पकडले. रामटेकडी येथील अण्णा भाऊ साठे उद्यानात ही घटना घडली होती. आरोपींकडून चोरीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. बंटी निकाळजे, चिक्या भडके, अनिकेत सोनवणे, सुमित शिंदे, मोनू शेख (रा. रामटेकडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत, तर त्यांच्या दोन अल्पवयीन साथीदारांनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत मनमोहन तिवारी (रा. रामटेकडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, 29 सप्टेंबर रोजी तिवारी हे आपल्या नातेवाइकांसह अण्णा भाऊ साठे उद्यानात गप्पा मारत बसले होते. यावेळी आरोपी निकाळजे, भडके, शिंदे, शेख तेथे आले. त्यांनी तिवारी व त्यांच्या नातेवाइकांना लोखंडी तलवार व चाकूने मारहाण केली. यानंतर त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने घेऊन आरोपी पसार झाले. याबाबत दाखल गुन्ह्यात वानवडी पोलिस ठाण्याचे पथक आरोपीच्या मागावर होते.
संबंधित ठिकाणावरील सीसीटीव्ही आणि इतर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून पोलिसांनी पाच जणांना अटक केली, तर त्यांच्या दोन अल्पवयीनांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार आणि चोरीचे चार मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. वानवडी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक जयवंत जाधव, उपनिरीक्षक अजय भोसले, कर्मचारी विनोद भंडलकर, अतुल गायकवाड, सर्फराज देशमुख, महेश गाढवे, राहुल गोसावी यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.