पुणे : प्रलोभाची मैत्री पडली 57 लाखांना; परदेशातून महागडे गिफ्ट अन् दोन कोटी पाठविण्याचे आमिष | पुढारी

पुणे : प्रलोभाची मैत्री पडली 57 लाखांना; परदेशातून महागडे गिफ्ट अन् दोन कोटी पाठविण्याचे आमिष

पुणे; पुढारी वृत्तसेवा: परदेशातून महागडे गिफ्ट आणि बँक खात्यात दोन कोटी रुपये पाठविण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेला 57 लाख 79 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून फिर्यादी महिलेसोबत सायबर चोरट्याची ओळख झाली होती. याप्रकरणी सिंहगड रोड परिसरातील एका ज्येष्ठ महिलेने सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 8 डिसेंबर 2021 ते 4 जून 2022 या कालावधीत घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला या सिंहगड रस्ता परिसरात राहायला आहेत, त्या गृहिणी आहेत. त्यांच्या मोबाईल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी व्हाट्सअ‍ॅपच्या माध्यमातून संपर्क साधला होता. त्या वेळी एका चोरट्याने त्याचे नाव एरिक ब—ाऊन असे सांगितले होते. परदेशात वास्तव्यास असल्याची बतावणी चोरट्यांनी केली होती. ज्येष्ठ महिलेला परदेशातून महागडे गिफ्ट आणि दोन कोटी रुपये भेट म्हणून पाठविण्यात येणार असल्याचे आमिष चोरट्यांनी दाखविले होते.

दरम्यान, ज्येष्ठ महिलेच्या मोबाइल क्रमांकावर आशा कुमारी नावाच्या महिलेने संपर्क साधला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियातून बोलत असल्याची बतावणी तिने केली. रिझर्व्ह बँकेशी साधर्म्य असलेला ईमेल महिलेला पाठविण्यात आला. ज्येष्ठ महिलेला आमिष दाखवून तिला वेळोवेळी 57 लाख 79 हजार 300 रुपये बँकखात्यात जमा करण्यास सांगितले. दरम्यान, महिलेला दोन कोटी रुपयांची रक्कम पाठविण्यात आली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. त्यानंतर या प्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे तपास करत आहेत.

Back to top button