पुणे : जिओची अनधिकृत केबल जप्त | पुढारी

पुणे : जिओची अनधिकृत केबल जप्त

पुणे; पुढारी वृत्तसेवा: सिंहगड रस्त्यावर अनधिकृतरीत्या टाकण्यात आलेली रिलायन्स जिओ कंपनीची केबल महापालिकेकडून जप्त करण्यात आली आहे. मात्र, महापालिकेने केवळ केबल जप्त केली असून, अनधिकृत केबल टाकल्याप्रकरणी कारवाई करण्याचे टाळले आहे. महापालिकेकडून पावसाळ्याच्या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता रस्ते खोदाईला बंदी असते. असे असताना शहरात चोरून रस्ते खोदाई सुरू आहे. सिंहगड रस्ता परिसरातील यशवंतनगर रस्त्यावरील क्षेत्रीय कार्यालयासमोर रिलायन्स जिओ कंपनीने केबल टाकली होती.

मात्र, असे असताना पथ विभागाच्या संबंधित अभियंत्यांनी त्यावर कारवाई केली नव्हती. याबाबत पथ विभागाचे कार्यकारी अभियंता अमर शिंदे यांना हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर अखेर त्यांनी सूचना दिल्यानंतर ही केबल कारवाई करून जप्त करण्यात आली. जवळपास 40 मीटर लांबीची ही केबल असून ती रिलायन्स जिओ कंपनीची असल्याची माहिती शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, याबाबत रिलायन्स जिओच्या जनसंपर्क अधिकार्‍यांकडे संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

जलवाहिन्यांबरोबर अनधिकृत केबल
यशवंतनगर रस्त्यावर सिंहगड क्षेत्रीय कार्यालय रस्ता परिसरात समान पाणी योजनेच्या जलवाहिन्या टाकण्यासाठी रस्ता खोदण्यात आला होता. या जलवाहिन्यांबरोबरच अनधिकृतरीत्या केबल टाकण्यात आली आहे. मात्र, महापालिकेने केवळ उघड्यावरील केबल जप्त केली आहे. पाण्याच्या लाईनबरोबर अनधिकृत केबल टाकण्याच्या प्रकाराकडे स्थानिक अधिकार्‍यांकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे. याबाबत विचारणा केली असता प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून कारवाई केली जाईल, असेही कार्यकारी अभियंता शिंदे यांनी सांगितले.

 

Back to top button