पुणे : फुलांचे तोरण अन् रांगोळीच्या पायघड्या; घराघरांत पारंपरिक वातावरणात साजरा झाला दसरा | पुढारी

पुणे : फुलांचे तोरण अन् रांगोळीच्या पायघड्या; घराघरांत पारंपरिक वातावरणात साजरा झाला दसरा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: दारी फुलांचे तोरण अन् रांगोळीच्या पायघड्या…. पारंपरिक वेशभूषेत केलेले धार्मिक विधी…घरातील साहित्यांचे पूजन… आपट्याची पाने (सोनं) देत लहानांनी घेतलेला मोठ्यांचा आशीर्वाद अन् घरोघरी सहकुटुंबाने एकत्रित घेतलेला पंचपक्वानांचा आस्वाद….अशा चैतन्यपूर्ण वातावरणात घराघरांमध्ये विजयादशमी साजरी करण्यात आली.

दोन वर्षांनंतर यंदा दसर्‍याला सगळीकडे आनंद बहरला होता. दसर्‍याच्या निमित्ताने देवीच्या मंदिरांमध्ये अभिषेक, पूजा-अर्चा, महाआरती झाली. खास फुलांची सजावट अन् विद्युत रोषणाईने मंदिरे उजळली होती. यानिमित्ताने मठ – मंदिरांमध्ये भजन – कीर्तनासह प्रवचन, व्याख्यानाचे कार्यक्रमही झाले.

घराघरांत धार्मिक विधी करतानाच धनसंपन्नता, यश, कीर्ती, एकोपा आणि आनंद नांदावा, यासाठी प्रार्थना करण्यात आली. मौल्यवान वस्तू, दागिने, शस्त्र, वाहनांचे विधिवत पूजन करण्यात आले. सरस्वती पूजनासह लहान मुलांच्या वही – पुस्तकांचेही पूजन करण्यात आले.काहींनी प्रत्यक्ष भेटून तर काहींनी सोशल मीडियाद्वारे एकमेकांना दसर्‍याच्या शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावर एकमेकांना संदेश पाठवून दसर्‍याचा आनंद साजरा करण्यात आला. यानिमित्ताने ठिकठिकाणी सायंकाळी सात वाजल्यानंतर रावण दहनही करण्यात आले. त्यालाही लोकांनी गर्दी केली.

मंदिरांमध्ये सीमोल्लंघनाच्या मिरवणुका….
दोन वर्षांनंतर यंदा वाजत-गाजत मंदिरांमध्ये मिरवणुका काढण्यात आल्या. त्यात बँडपथक, ढोल-ताशा पथक, सनई-चौघडा, नगारावादन आदींचा समावेश होता. प्रथेप्रमाणे अन् परंपरेनुसार या मिरवणुका काढण्यात आल्या.

सुवर्णवस्त्रातील रूपाचे भाविकांनी घेतले दर्शन
सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही विजया दशमीला मंदिरातील देवीच्या मूर्तीला 16 किलो सोन्याची साडी परिधान करण्यात आली. श्री महालक्ष्मी मंदिराचे संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, अमिता अग्रवाल, अ‍ॅड. प्रताप परदेशी, तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल आदी यावेळी उपस्थित होते. श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता भक्तांनी गर्दी केली.

Back to top button