

पुणे; पुढारी वृत्तसेवा: राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाच्या दुसर्या टप्प्यात 2025 पर्यंत राज्यातील 25 लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच जलयुक्त शिवार योजना नव्या स्वरूपात आणली जाईल, अशी घोषणाही त्यांनी केली. पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात राज्याच्या कृषि विभागामार्फत आयोजित 'नैसर्गिक शेती' या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन गुरुवारी (दि.6) गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.
व्यासपीठावर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते. राज्यातील दोन हजारांहून अधिक शेतकरी परिषदेस उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन यशस्वी ठरले.
या मिशनचा कालावधी संपत असला तरी त्यास मुदतवाढ देऊन आणखी काही जिल्ह्यांचा समावेश करून नैसर्गिक शेतीला चालना दिली जाईल. राज्यात मागील काळातील जलयुक्त शिवार योजनचे फायदे लक्षात घेऊन नव्या स्वरूपात ही योजना आणली जाईल. पुढच्या टप्प्यात पाण्याबाबत गावे जलस्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे ते म्हणाले.
आरोग्याच्या दृष्टीनेही नैसर्गिक शेती महत्त्वाची : चंद्रकांत पाटील
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, नैसर्गिक शेतीचे महत्त्व सर्वांना कळले आहे. नैसर्गिक शेती शेतकर्याच्या उत्पन्न वाढीसोबतच माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे.
विषमुक्त शेतीविषयीचे शासन धोरण लवकरच : कृषिमंत्री
कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, शेतकरी नैसर्गिक शेतीकडे वळविण्यासाठी कृषी विभागातर्फे प्रयत्न करण्यात येईल. विषमुक्त शेतीविषयीचे शासनाचे धोरण लवकरच ठरविण्यात येऊन त्याची अंमलबजावणी कृषी विभागामार्फत राज्यात करण्यात येईल.
भौगोलिक मानांकन पिकांचा महोत्सव आयोजित करणार : फलोत्पादनमंत्री
अपेडा संस्थेमार्फत फलोत्पादन पिकांच्या निर्यातीत फळबागांची नोंदणी करण्यात येत आहे. 22 पिकांना भौगोलिक मानांकन मिळाले आहे. त्यामुळे राज्याची ओळख निर्माण झाली असून, अशा पिकांचा महोत्सव आयोजित करण्यात येणार असल्याचे फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी यावेळी सांगितले.
नैसर्गिक शेतीसाठी लोकचळवळ उभी करा : राज्यपाल आचार्य देवव्रत
नैसर्गिक शेतीमुळे जलप्रदूषण होणार नाही, पर्यावरणाचे रक्षण होईल, पाण्याची बचत व जमिनीचा पोत चांगला राहील, नागरिकांचे आरोग्य चांगले राहील, शेतकर्यालादेखील लाभ होईल. त्यामुळे नैसर्गिक शेतीसाठी लोकचळवळ उभी करण्याचे आवाहन गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.