जेजुरी : तलवार तोलून धरणे स्पर्धत अमोल खोमणे, कसरत स्पर्धेत सचिन कुदळे प्रथम | पुढारी

जेजुरी : तलवार तोलून धरणे स्पर्धत अमोल खोमणे, कसरत स्पर्धेत सचिन कुदळे प्रथम

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा : जेजुरीच्या खंडोबा देवाचा मर्दानी दसरा उत्सव विविध उपक्रमांनी साजरा झाला. दसऱ्यानिमित्त आयोजित तलवार स्पर्धेला तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. या स्पर्धेत ९ शेर वजनाची तलवार एका हाताने वर उचलून तोलून धरणे या स्पर्धेत अमोल खोमणे याने प्रथम तर तलवार हातात घेवून विविध कसरती करणे या स्पर्धेत सचिन कुदळे याने प्रथम क्रमांक पटकाविला.

ऐतिहासिक काळात श्रीमंत पेशवे यांच्या दरबारात पुरंदर येथील सोनोरीच्या मल्हार गडाचे पानसे हे सरदार होते. पानिपतच्या युद्धात पेशवे यांचा तोफखाना इब्राहीम गारदी यांच्याकडे होता. गारदयांच्या मृत्युनंतर तोफखान्याची जवाबदारी सरदार महिपतराव पानसे व रामराव पानसे यांच्याकडे आली. सरदार पानसे हे खंडोबा देवाचे निस्सीम भक्त होते. युद्धावर जाताना खंडोबा देवाला केलेल्या नवसाची पूर्ती म्हणून सरदार पानसे यांनी देवाला ९ शेर किलो वजनाची तलवार व कासवाच्या पाठीची ढाल अर्पण केली होती. पुढे ही तलवार एका हाताने वर उचलून तोलून धरणे, तसेच तलवारीच्या कसरतीच्या स्पर्धांची परंपरा सुरु झाली. या स्पर्धेला देवसंस्थानने नावलौकिक मिळवून दिला आहे.

गुरुवारी (दि. ६) सकाळी जेजुरी गडावर तलवारीचे पूजन करून स्पर्धेला सुरुवात झाली. तलवार तोलून धरण्याच्या स्पर्धेत ३५ स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेत प्रथम अमोल खोमणे, द्वितीय मंगेश चव्हाण, तृतीय हेमंत माने, उत्तेजनार्थ बाबा माने व विजय कामथे यांनी बाजी मारली. तलवारीच्या कसरत स्पर्धेत प्रथम सचिन कुदळे, द्वितीय शिवाजी राणे, तृतीय नितीन कुदळे, उत्तेजनार्थ अक्षय गोडसे, विशाल माने आणि सौरभ सकट राहिले. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांक २५ हजार, द्वितीय २१ हजार ,तृतीय व उत्तेजनार्थ विजेत्यास ७ हजार रुपये व गौरव चिन्हे देवून गौरविण्यात आले. यावेळी श्री मार्तंड देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त तुषार सहाने, विश्वस्त शिवराज झगडे, पंकज निकुडे पाटील, संदीप जगताप, डॉ. राजकुमार लोढा, सॉलीसीटर प्रसाद शिंदे, ॲड. अशोकराव संकपाळ, मुख्याधिकारी राजेंद्र जगताप, व्यवस्थापक सतीश घाडगे, बाळासाहेब खोमणे, गणेश डीखळे, महेश नाणेकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे पंच म्हणून माजी विश्वस्त सुधीर गोडसे, कृष्णा कुदळे, पालखी सोहळ्याचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, माउली खोमणे, सोमनाथ उबाळे आदींनी काम पहिले.

Back to top button