बारामती : मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत: अजित पवार यांचा आरोप

बारामती : मुख्यमंत्री खोटे बोलत आहेत: अजित पवार यांचा आरोप

बारामती; पुढारी वृत्तसेवा: वेदांता प्रकल्पाबाबत टक्केवारीचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धादांत खोटे बोलत आहेत. टक्केवारीचा आरोप निरर्थक असून त्यांनी ते सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिले. बारामतीत पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, वेदांता प्रकल्पाला आणखी कोणत्या सवलती द्यायच्या या संदर्भातील बैठक १५, १६ जुलैला मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झाली असून या बैठकीचे मुद्दे आपल्याकडे आहेत. आमचे सरकार जूनला पायउतार झाले.

सरकार गेल्यानंतर मुख्य सचिव उच्चाधिकार समितीची बैठक घेतात. वेदांता फाॅक्सकाॅनचा प्रकल्प हा शिंदे-फडणवीस सरकारच्या कमीपणामुळेच गेला. राज्यात-केंद्रात त्यांच्या विचारांचे सरकार आहे. पण हा प्रकल्प गेल्याने दोन लाख तरुणांचा रोजगार गेला. या तरुणांचा रोष आपल्यावर नको असे त्यांना वाटते. त्यातून आपले अपयश झाकण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केले असावे. विधानसभेतही मुख्यमंत्री वेदांता प्रकल्प येत असल्याचे भाषणात म्हणाले होते. मग त्यांनी टक्केवारीचा आरोप कसा केला. त्यांनी तो सिद्ध करून दाखवावा, असे आव्हान पवार यांनी दिले.

माध्यमांना चिमटा
मुंबईत दसऱ्याला पार पडलेल्या दोन्ही मेळाव्याबाबत ते म्हणाले, दसरा मेळाव्यातील दोन्हीकडील भाषणे सगळ्यांनी बघितली. शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचे आणि बीकेसी मैदानावरील एकनाथ शिंदे यांनी काय मार्गदर्शन केले, हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितले. आम्ही पण बघितले. त्यांनी त्यांचे विचार सर्वासंमोर ठेवले आहेत. त्यांचे पक्षांतर्गत प्रश्न असल्याने सर्वांना उत्सुकता होती. कशी गर्दी होती, काय होती हे पण मिडियाने दाखवले. चहा मिळाला का? नाश्ता मिळाला का? हे पण दाखवले, असे म्हणत पवार यांनी माध्यमांना चिमटा काढला.

मूळ शिवसेना कोणाची याचा विचार व्हावा
पवार म्हणाले, मी दोघांची भाषणे ऐकली. पहिलं उद्धव ठाकरे यांचे भाषण झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे झाले. दोघांनी काय भाषण केली हे सर्वांनी पाहिलं. त्यावर आता जास्त टिका-टिपणी करण्याची गरज नाही. आम्ही उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वात काम केले. ठाकरे मंत्रीमंडळातील वरिष्ठ मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही काम केले. त्यांच्या आता राजकीय बाबी सुरु आहेत. त्याबद्दल बारकाईने विचार करून राज्यातील जनतेने पुढची भूमिका घेतली पाहिजे. कोणाची शिवसेना मूळ शिवसेना आहे, याचा विचार करावा असे पवार म्हणाले.

आवडीनिवडीसाठी भाषणे नव्हती
कोणाचे भाषण आवडले या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. ही काही आवडीनिवडीसाठी भाषणे नव्हती. दसऱ्याच्या शुभमुहुर्तावर राज्यातील शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी मुंबईत यायचे, ही परंपरा आहे. पण मेळाव्यासाठी दहा कोटी रुपये खर्च करून गर्दी जमवली. त्यासाठी एसटी बसगाड्या बुक केल्या. त्यातून सामान्यांना सणासुदीला एसटी उपलब्ध झाली नाही, असा चिमटा त्यांनी शिंदे गटाला काढला. मेळाव्यात काहींची भाषणं फारच लांबली. नको इतकी लांबली. आता ती कुणाची होती, याचा विचार तुम्हीच करा, असेही ते म्हणाले.

तो आरोप राजकीय
ठाकरेंची शिवसेना राष्ट्रवादीच्या अजेंठ्यावर चालते यात काही तथ्य नाही. तो आरोप राजकीय असल्याचे पवार म्हणाले. मंत्रिमंडळात काम करत असताना ते माझ्या उजव्या बाजूला बसायचे. याच्यात मी कधी ऐकले नाही की झेंडा शिवसेनेचा आहे, अजेंडा राष्ट्रवादीचा आहे. कारण तिथे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस होती. आम्हाला अनेक वर्ष वेगवेगळे पक्षाला घेऊन सरकार चालवण्याचा अनुभव आहे. सन २००४ व २००९ ला देखील आघाडी होती. त्यामुळे असे काही नसते. यामध्ये आम्ही कर्जमाफीचा निर्णय घेतला, तो सगळ्यांचा होता. कोरोनाचा मुकाबला करताना सर्वांच्याच बाबतीत तो निर्णय घेतला. इतरही निर्णय सर्वांसाठीच घेतलेले आहेत. काल जे काही वक्तव्य त्यांनी केले, ते राजकीय हेतूने होते असे त्यांनी स्पष्ट केले.

अंधेरीच्या पोटनिवडणूकीत शिवसेनेला पाठिंबा
अंधेरीच्या पोटनिवडणूकीत शिवसेनेच्या उमेदवाराला काॅंग्रेसने पाठींबा दिला आहे. राष्ट्रवादीने देखील या उमेदवाराला पाठींबा दिला असल्याचे अजित पवार म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news