पुणे: पालखी महामार्गावरील रेल्वे गेटचे काम रद्द, सणासुदीच्या काळात हा रस्ता होणार होता बंद | पुढारी

पुणे: पालखी महामार्गावरील रेल्वे गेटचे काम रद्द, सणासुदीच्या काळात हा रस्ता होणार होता बंद

वाल्हे, पुढारी वृत्तसेवा: पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील पुणे-मिरज लोहमार्गावर वाल्हे-नीरा यादरम्यानचे थोपटेवाडी (ता. पुरंदर) हद्दीतील रेल्वेफाटक क्रमांक 27 किलोमीटर 79/01 रेल्वेगेट सोमवारी (दि. 3) सकाळी 7 ते बुधवारी (दि. 5) सकाळी 7 पर्यंत (48) तास वाहतुकीसाठी बंद राहणार होते. परंतु, त्याला परवानगी न मिळाल्याने आता हा निर्णय रद्द करण्यात आला आहे.

यासंदर्भातील वृत्त दै. ‘पुढारी ने रविवारी प्रसिद्ध करून ऐन सणासुदीच्या काळात हा रस्ता बंद होणार असल्याने लोकांची व्यथा मांडली होती. याची दखल स्थानिक प्रशासनाने घेत परवानगी नाकारल्याने हे काम रद्द केल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर दिली आहे. त्यामुळे दसरा सणानिमित्ताने गावी जाणार्‍या प्रवाशांचा 40 किलोमीटरचा वळसा टळला आहे.

मागील तीन महिन्यांत हा रस्ता पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या कामामुळे थोपटेवाडी (ता. पुरंदर) येथील गेट नंबर 27 किलोमीटर 79/01 हा तीनवेळा बंद ठेवण्यात आला होता. पंढरपूरच्या एकादशीच्या आधी दोन दिवस तसेच गणेशोत्सवाआधी दोन दिवस बंद ठेवल्याने प्रवाशांना चाळीस किलोमीटरचा वळसा घालून ये-जा करावी लागत होती. या वेळीही रेल्वे प्रशासनाने पुन्हा दसर्‍याचा मुहूर्त साधून दसरा सणाच्या आधी दोन दिवस पालखी महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

Back to top button