बेल्हे : बुडालेल्या तरुणांचे मृतदेह शोधण्यास यश, आपत्ती व्यवस्थापन पथकाची दोन दिवस तपासणी मोहीम | पुढारी

बेल्हे : बुडालेल्या तरुणांचे मृतदेह शोधण्यास यश, आपत्ती व्यवस्थापन पथकाची दोन दिवस तपासणी मोहीम

बेल्हे, पुढारी वृत्तसेवा: बोरी बुद्रुक (ता. जुन्नर) शिवारात कुकडी नदीपात्रात पोहताना प्रवाहात बेपत्ता झालेल्या दोन्ही युवकांचे मृतदेह शोधण्यात सोमवारी आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश आले. शनिवारी सकाळी हे दोन्ही युवक बेपत्ता झाले होते. बोरी बुद्रुक शिवारात कुकडी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन युवकांना बुडत असताना वाचविण्यात यश मिळाले, पण त्यासाठी नदीपात्रात उतरलेले बापू धुळे, अमोल धुळे पाण्याच्या भोवर्‍यात अडकून बेपत्ता झाले. त्यांना शोधण्यासाठी जुन्नर रेस्क्यु टीम, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाने शनिवार दुपारपासून अथक प्रयत्न केले.

पथकाला रविवारी सायंकाळी बापू धुळे यांचा मृतदेह शोधण्यास यश मिळाले. सोमवारी घटनास्थळापासून दीड किलोमीटर अंतरावर नदीपात्रात अमोल धुळे यांचा मृतदेह सापडला. पथकाने मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेहांचे आळे प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.

घटनास्थळी तहसीलदार रवींद्र सबनीस, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, मंडलाधिकारी नितीन चवरे, तलाठी शीतल गर्दी, सरपंच वैशाली जाधव, ग्रामसेवक बाळासाहेब बेंद्रे, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य दोन्ही मृतदेहांचे शोध लागेपर्यंत तळ ठोकून होते. तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी संबंधित कुटुंबाला येणार्‍या अडचणीच्या काळात मदतीचे प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

Back to top button