भवानीनगर : ऊस वाहतूकदारांना बसतोय आर्थिक फटका; साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू नसल्याचा परिणाम | पुढारी

भवानीनगर : ऊस वाहतूकदारांना बसतोय आर्थिक फटका; साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू नसल्याचा परिणाम

भवानीनगर, पुढारी वृत्तसेवा: राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम दि. 1 ऑक्टोबरला सुरू होईल, या अपेक्षेने ऊस वाहतूकदारांनी एक महिन्यापूर्वीच ऊसतोडणी करणार्‍या मजुरांना कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आणून ठेवले. आता या मजुरांचा सांभाळ करताना ऊस वाहतूकदारांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.

या वर्षी सर्व साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात गाळपासाठी उसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असल्याने राज्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय दि. 1 ऑक्टोबरला होईल, असे ऊसतोडणी वाहतुकीचे काम करणार्‍या ऊस वाहतूकदारांना वाटत होते. मोठा गाळप हंगाम असल्याने ऊसतोडणी कामगारांकडून फसवणूक होऊ नये, यासाठी ऊस वाहतूकदारांनी दि. 1 सप्टेंबरपासूनच मजुरांना आणण्यास सुरुवात केली. 15 सप्टेंबरपर्यंत ऊस वाहतूकदारांनी मोठ्या प्रमाणात ऊसतोडणी करणार्‍या मजुरांना साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात आणून ठेवले आहे. मात्र, गाळप हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू होणार असल्याने ऊसतोडणी वाहतुकीचे काम करणार्‍या वाहतूकदारांवर ऊसतोडणी करणार्‍या मजुरांना सांभाळण्याची वेळ आली आहे. एका ट्रॅक्टरवर साधारणपणे दहा कोयते काम करतात. एक स्त्री व एक पुरुष मिळून एक कोयता होतो. या एका ऊस वाहतूकदाराला दहा कोयते म्हणजे 20 मजूर व त्यांची मुले मिळून सुमारे 30 लोकांचा सांभाळ करण्याची वेळ आली आहे.

ऊसतोडणीचे काम बंद असल्यामुळे या मजुरांना किराणा व धान्याची मोफत व्यवस्था करून द्यावी लागते, तसेच या मजुरांची पळवापळवी करण्यासाठी इतर साखर कारखान्यांच्या परिसरातील ऊस वाहतूकदार प्रयत्न करीत असतात. असे ऊस वाहतूकदार काही मुकादमांच्या संपर्कात असतात. ऊसतोडणीचे काम बंद असल्यामुळे मुकादामांची देखील चलबिचल चालू असते. त्यामुळे कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आणून ठेवलेल्या ऊसतोडणी करणार्‍या मजुरांवर डोळ्यांत तेल घालून ऊस वाहतूकदारांना लक्ष ठेवावे लागत आहे.

खान्देशातील टोळ्या मोठ्या प्रमाणात दाखल

आतापर्यंत बारामती अ‍ॅग्रो, श्री छत्रपती, सहकारमहर्षी, निरा-भीमा, माळेगाव, सोमेश्वर अशा अनेक कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊसतोडणी वाहतूक करणार्‍या मजुरांच्या टोळ्या दाखल झालेल्या आहेत. यात नंदुरबार, चाळीसगाव, धुळे येथील मजुरांच्या टोळ्यांचा समावेश आहे.

Back to top button