पाटस : कच्चा मालाची वाहतूक बंद करा, सिमेंट कंपनीसमोर जमला मोठा जमाव; पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे | पुढारी

पाटस : कच्चा मालाची वाहतूक बंद करा, सिमेंट कंपनीसमोर जमला मोठा जमाव; पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे

पाटस, पुढारी वृत्तसेवा: पाटस (ता. दौंड) रेल्वे स्टेशन परिसरातील सिमेंट कंपनीला कच्चा माल नेण्यात येतो. पाटस-कानगाव रस्त्यावर सतत हा कच्चा माल सांडत असल्याने या धुळीचा त्रास स्थानिक नागरिकांबरोबर विद्यार्थी, तसेच दुचाकीचालकांना होत आहे. त्यामुळे ही वाहतूक बंद करण्याची मागणी स्थानिकांनी कंपनीच्या अधिकार्‍यांकडे केली आहे. या वेळी कंपनीविरोधात मोठा जमाव जमला होता.
पाटस (ता.दौंड) रेल्वे स्टेशन परिसरात सिमेंट कंपन्या सुरू झाल्या असल्याने पाटस-कानगाव रस्त्यावरून या कंपनीसाठी लागणार्‍या कच्च्या मालाची अवजड वाहनातून भरधाव वेगाने मोठ्या प्रमाणावर वाहतूक होते.

त्यामुळे या रस्त्यावर कच्चा माल सर्वत्र पडत असल्याने रस्त्यावर पांढर्‍या रंगाचा थर तयार झाला आहे. परिणामी, प्रवास करणार्‍या दुचाकी वाहनचालक व शाळेत ये-जा करणार्‍या विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत वार्‍यामुळे ही धूळ जात आहे. दुचाकी व शालेय विद्यार्थ्यांच्या सायकल यावर घसरून अपघाताच्या घटना घडल्या आहेत.

दरम्यान, गुरुवारी (दि. 29 सप्टेंबर) रात्री 8.30 वाजेच्या सुमारास एका अवजड वाहनातून मोठ्या प्रमाणावर असा कच्चा माल रस्त्यावर सांडल्याचे स्थानिक नागरिकांना दिसून आले. त्यांनी मालवाहतूक करणारी गाडी थांबवून ही बाब कंपनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. सिमेंट कंपनीचे अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आहे आणि वरिष्ठांना फोनवरून या प्रकाराबाबत माहिती दिली आहे. कंपनीच्या अधिकार्‍यांना पाटस येथील स्थानिक नागरिकांनी अशी चुकीच्या पद्धतीने होणारी वाहतूक थांबवण्याची मागणी केली . असे प्रकार पुन्हा घडणार नाही, याची दक्षता घेण्याची विनंती केली आहे. दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पाटसचे सहायक फौजदार सागर चव्हाण, हवालदार बंडगर, समीर भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवत नागरिकांना शांत केले.

Back to top button